मुंबई : मासिक पाळीच्या काळात वापरण्यात आलेल्या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावणे हे प्रत्येक पालिका प्रशासनांसमोर मोठे आव्हान. त्यामुळेच धारावीतील विद्यार्थ्यांनी उसाचा चोथा आणि टाकाऊ वस्तूंपासून जैवविघटनशील सॅनिटरी पॅड तयार केले आहेत. १०वीच्या एका विद्यार्थ्याच्या संकल्पनेला अन्य विद्यार्थ्यांनी कल्पकतेची जोड दिली आणि या सॅनिटरी पॅडची निर्मिती झाली. या पॅडचा वापर करणार्‍यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने लवकर हे पॅड बाजारात आणण्यात येणार आहे.

धारावीतील बीएसआयएएस इंग्लिश स्कूलमधील गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना शाळेचा प्रकल्प म्हणून वेगळी संकल्पना मांडण्यास शिक्षकांनी सांगितले असता जैवविघटनशील सॅनिटरी पॅडची संकल्पना १०वीतल्या एका विद्याथ्र्याने मांडली. त्या विद्यार्थ्याचे नाव शेख अली महम्मद इसाक. धारावीतील शहीद भगतसिंग नगर झोपडपट्टीत राहणार्‍या अलीला कचर्‍यात सॅनिटरी पॅड अस्ताव्यस्त पडलेले दिसायचे. त्याची विल्हेवाट कशी लावली जाते आणि सॅनिटरी पॅडबाबत त्याने आणि त्याच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांना जैवविघटनशील आणि आरोग्यासाठी फायदेशीर सॅनिटरी नॅपकिनची किती गरज आहे हे जाणवले. त्यातून अली आणि त्याच्या मित्रांनी संशोधन करून टाकाऊ वस्तूपासून सॅनिटरी पॅड तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उसाच्या चोथ्यापासून सॅनिटरी पॅड बनविण्यास सुरुवात केली. कागदनिर्मिती, कंपोस्ट खत, पशू आहार आणि प्लास्टिकला पर्याय म्हणून पुढे आलेला उसाचा चोथा हा अलीच्या जैवविघटनशील सॅनिटरी पॅडमधील मुख्य घटक. सहज आणि मोफत उपलब्ध होणारा असा हा घटक. तेव्हा या विद्यार्थ्यांनी आपल्या भागातील उसाचा रस विकणार्‍या विक्रेत्यांना विनंती करून त्यांच्याकडून उसाचा चोथा मिळविण्यास सुरुवात केली.

उसाचा चोथा सुकवून त्यानंतर तो उकळून घेत पुन्हा तो सुकवला. त्यानंतर त्याचा मऊ लगदा तयार करून घेत त्यात कोरफडीचा गर, चंदन पावडर, सुती कापड यांचा वापर करून सॅनिटरी पॅड तयार केले. त्यानंतर या पॅडची चाचणी शाळेतील काही पालकांनी केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि या विद्यार्थ्यांचा प्रकल्प यशस्वी झाला. या प्रकल्पाने काही स्पर्धेत बाजीही मारली. १५ ऑगस्टला अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून (एएनडीपीएल) आयोजित विज्ञान परिषदेतही या प्रकल्पाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

दरम्यान, उसाच्या चोथ्यापासून सॅनिटरी पॅड तयार करण्याचा प्रयोग भारतात काही ठिकाणी यशस्वी झाला आहे. मात्र शालेय विद्यार्थ्यांनी, त्यातही धारावीसारख्या झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांनी असा अनोखा प्रयोग करणे कौतुकास्पद मानले जात आहे.

लवकरच बाजारात उपलब्ध

सध्या या सॅनिटरी पॅडची चाचणी सुरूच असून लवकरच बाजारात आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मारी अरुणाचलम यांनी दिली. झोपडपट्टी भागात वा खेड्यात अजूनही आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना, तरुणींना बाजारातील पॅड परवडत नाहीत. त्यामुळे आजही काही प्रमाणात अशा महिलांकडून कापडाचा वापर होत असल्याचे म्हटले जाते, तर बाजारातील सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावणे अवघड असते. त्यामुळे जैवविघटनशील आणि परवडणार्‍या दरातील, आरोग्यासाठी फायदेशीर असे हे पॅड असल्याचेही अरुणाचलम म्हणाल्या.

मासिक पाळीत स्वच्छतेची आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक आणि आरोग्यासाठी फायदेशीर पॅडचा वापर करणे आणखी योग्य ठरेल. मासिक पाळीत योग्य काळजी घेतली गेली नाही तर जननेंद्रियाच्या भागातील संसर्ग, त्वचेची जळजळ, पुरळ अशा समस्या उद्भवू शकतात. महत्त्वाचे म्हणजे पुढे जाऊन मूल होण्यास अडथळाही येऊ शकतो. त्यामुळे मासिक पाळीत महिलांनी योग्य सॅनिटरी पॅडचा वापर करावा. – डॉ. राजश्री कटके, ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ, सेंट जॉर्ज रुग्णालय

मुंबईत १५० टन सॅनिटरी पॅडचा कचरा

मुंबईत दररोज १५० टन सॅनिटरी पॅडचा कचरा संकलित केला जातो. प्रकल्पनिहाय दररोज अंदाजे ५.५ टन कचर्‍याचे संकलन होते, तर दोन वर्षांत १,४१२.१५६ टन सॅनिटरी पॅडचा कचरा संकलित करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली. अशा कचर्‍याची योग्य, शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी १ मे २०२५ पासून घरगुती सॅनिटरी कचरा संकलन सेवा सुरू करण्यात आली. त्यानुसार पिवळ्या डब्यात सॅनिटरी पॅडचा कचरा संकलित करणे बंधनकारक करण्यात आले, तर या संकलित कचर्‍याची विल्हेवाट मुंबईतील सहा प्लाझ्मा दहन प्रकल्पांत लावली जाते.

हे पॅड कमीत कमी सहा तास वापरता येते, तर हे पॅड तयार करण्यासाठी खर्च तसा फारसा येत नसल्याने ते १० ते २० रुपयांत उपलब्ध करून देणे आम्हाला शक्य होईल. या पॅडची विल्हेवाट लावणेही सोपे आहे. कारण यात सर्व विघटनशील घटक असल्याने ते कागदात गुंडाळून मातीत पुरले की काही महिन्यांनी त्याचे विघटन होऊन त्याचे उत्तम खतात रूपांतर होते. या पॅडमुळे कोणताही संसर्ग होण्याची शक्यता नसल्याने आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. – शेख अली महम्मद इसाक, (जैवविघटनशील सॅनिटरी पॅडची संकल्पना मांडणारा विद्यार्थी)