मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे समाजरचना झपाट्याने बदलत असताना त्याचे मानवी आणि सामाजिक परिणाम समजून घेण्यासाठी सामाजिक विज्ञान संशोधन अधिक सक्षम होण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, स्थलांतर, सामाजिक संघर्ष आणि वाढती विषमता यांसारख्या जागतिक आव्हानांच्या काळात सामाजिक विज्ञान अधिक जबाबदार, मानवी मूल्यांवर आधारित आणि समाजाभिमुख असले पाहिजे. या बदलांचा अभ्यास करण्यासाठी टीआयएसएससारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीस)ने येथे आयोजित केलेल्या ‘ग्लोबल कोलोक्वियम २०२६ : बिल्डिंग ब्रिजेस इन सोशल सायन्सेस’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेला २५ देशांतील संशोधक, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध विद्यापीठांतील अभ्यासक सहभागी झाले आहेत.

सामाजिक विज्ञान हे केवळ अभ्यासाचे क्षेत्र नसून समाजाला नैतिक दिशा देणारी शक्ती आहे. भौतिक विज्ञान मोजता येते, पाहता येते; मात्र सामाजिक विज्ञान ही समाजाची अमूर्त परंपरा आहे. समाजाच्या नैतिक दिशेला आकार देण्याचे कार्य सामाजिक विज्ञान करते. जागतिक पातळीवरील बौद्धिक संवाद वाढील लागण्यात भारताची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रधान म्हणाले.

केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनीत जोशी यांनी सामाजिक विज्ञान संशोधन हे शाश्वत विकास, सामाजिक न्याय आणि लोककेंद्रित प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. असमानता, स्थलांतर, हवामान बदल, नागरीकरण आणि संघर्ष यांसारख्या प्रश्नांवर समुदायाधारित आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. टीसचे कुलपती प्रा. डी. पी. सिंग यांनी ही परिषद केवळ शैक्षणिक कार्यक्रम नसून जागतिक भागीदारी निर्माण करणारे व्यासपीठ असल्याचे सांगितले.

‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर’ या संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी भारताच्या ज्ञानपरंपरा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० यांचा संदर्भ दिला. जागतिक सहकार्य करताना स्थानिक वास्तवाशी जोडलेले राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टीसचे कुलगुरू प्रा. बद्री नारायण तिवारी यांनी भारतीय आणि ग्लोबल साऊथमधील ज्ञानपरंपरा, स्थानिक अनुभव आणि लोकजीवन यांवर आधारित संशोधनाला अधिक महत्त्व देण्याची आवश्यकता व्यक्त केली.