मुंबई : सुमारे ३४ हजार कोटींना बँकेला गंडविल्याप्रकरणी दिवाण हौसिंग फायनान्स कॅार्पोरेशन आणि संचालकांविरुद्ध सुरु असलेल्या तपासात कपिल आणि धीरज वाधवान या बंधुनी सक्तवसुली संचालनालयाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्ह्याच्या रकमेतून खरेदी केलेल्या लंडनमधील बंगला आडमार्गाने पत्नीच्या कंपनीलाच विकल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संबंधित मालमत्ता संचालनालयाने जप्त केला आहे.
दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि संचालकांनी केलेल्या कर्ज फसवणुकीशी संबंधित काळा पैसा प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) तपास सुरु आहे. १७ बँकांच्या समूहाच्या (कन्सोर्टियम) वतीने ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे संचालनालयाने तपास सुरू केला आहे. यानुसार, कपिल आणि धीरज वाधवान या बंधुंसह आरोपींनी बँकांच्या समूहाकडून ४२ हजार ८७१ कोटी रुपयांची कर्जापोटी घेतले होते. ही कर्जे फेडण्याऐवजी हिशेबाच्या पुस्तकांमध्ये फेरफार करून कर्जाची रक्कम अन्य कंपन्यांमध्ये वळवण्यात आली आणि गैरवापर करण्यात आला. परिणामी कर्ज देणाऱ्या बँकांच्या समूहाचे अंदाजे ३४ हजार ६१५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रमुख आरोप आहे.
ब्रिटनमधील ‘हर्टमोर हाऊस’ ही मालमत्ता कपिल वाधवान यांची पत्नी वनिता वाधवान यांच्या नावावर आहे. ही मालमत्ता बनावट दायित्व निर्माण करून बोगस व्यवहाराद्वारे निकाली काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवहाराबाबत मे. अल जालोर ट्रेडिंग आणि वनिता वाधवान यांच्यात कर्ज करारनामा करण्यात आला. यानुसार ही मालमत्ता गहाण ठेवण्यात आल्याचे दाखविण्यात आले. २०२६ मध्ये या मालमत्तेची विक्री झाली आणि या विक्रीतून मिळालेली रक्कम वनिता वाधवान यांच्याऐवजी ‘मे. अल जालोर ट्रेडिंग’ या कंपनीच्या बँक खात्यात वळवण्यात आली. मुळात ही दुबईस्थित कंपनी वनिता वाधवान यांच्याशी संबंधित असल्याचा संचालनालयाचा संशय आहे.
झडतीची कार्यवाही सुरू असताना, मे. अल जालोर ट्रेडिंग या कंपनीच्या बँक खात्याची तपासणी करण्यात आली तेव्हा हा प्रकार उघड झाला. त्यानंतर संचालनालयाने ही मालमत्ता सुमारे ५.४१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (५१.७५ कोटी) इतकी रक्कम काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गोठवण्यात आली. या व्यवहारांशी आणि मालमत्तेशी संबंधित इतर आक्षेपार्ह कागदपत्रे व नोंदी देखील या झडतीदरम्यान जप्त करण्यात आल्या. कर्ज फसवणुकीतून निर्माण झालेले दायित्व पूर्ण करण्याच्या उद्देशाने परदेशी मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठीच बोगस व्यवहारांचा वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
