मुंबई : ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या आदित्य धर दिग्दर्शित सिक्वेलपटाने आगाऊ तिकीट विक्रीतून घसघशीत कमाई करत चित्रपटाच्या यशाची ग्वाही दिली आहे. गेल्यावर्षी डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’च्या देशभरातील हजार कोटींहून अधिक विक्रमी कमाईच्या चर्चेचा धुरळा अजून कायम आहे. अवघ्या तीन महिन्यांत या चित्रपटाचा सिक्वेलपट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. मात्र, गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेले पेड प्रीमिअर शोज आणि प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीची आगाऊ तिकीट विक्रीच्या एकूण कमाईचा आकडा १३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
पाकिस्तानमध्ये जाऊन तिथल्या लयारी गँगला संपवत स्वतःचे वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्या भारतीय हेराची काल्पनिक कथा रंगवणारा ‘धुरंधर’ हा आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट ५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित झाला होता. आत्तापर्यंत जवळपास शंभर दिवसांहून अधिक काळ चित्रपटगृहात ठाण मांडून बसलेल्या या चित्रपटाने देशभरात १०५६. ६२ कोटींची कमाई केली आहे, जगभरातून केलेल्या कमाईची रक्कम जोडली तर या चित्रपटाने तब्बल १४२८ कोटींची कमाई केली आहे.
पहिल्या चित्रपटाला मिळालेले हे दणदणीत यश लक्षात घेत, निर्मात्यांनी १८ मार्चला ‘धुरंधर : द रिव्हेंज’ नावाने प्रदर्शित होणाऱ्या सिक्वेलपटाचे पेड प्रीमिअर शोज आयोजित केले आहेत. या पेड प्रीमिअरचे मुंबईतील आयनॉक्स चित्रपटगृहातील मेगाप्लेक्सचे सर्वात महागडे तिकिट अडीच हजार रुपये आहे, तर नामांकित बहुपडदा चित्रपटगृहांच्या तिकिटांचे दरही हजाराच्या पुढे आहेत. मात्र, एकपडदा चित्रपटगृहांपासून ते बहुपडदा चित्रपटगृहांपर्यंत सगळे पेड प्रीमिअर शोज जवळपास हाऊसफुल आहेत.
‘धुरंधर’मध्ये लयारीतील सत्तेची सूत्रे हातात घेणाऱ्या या भारतीय हेराची पुढची गोष्ट पाहण्यासाठी उत्सूक असलेल्या प्रेक्षकांनी ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या सिक्वेलपटाच्या गुढीपाडव्याला होणाऱ्या प्रदर्शनासाठीही चांगलीच गर्दी केली आहे. देशभरातून या नव्या सिक्वेलपटाचे पहाटेपासून ते रात्रीपर्यंत तब्बल १५ हजार शोज दाखवले जाणार आहेत. या चित्रपटाचे पेड प्रीमिअर शो, पहिल्या दिवशीचे देश-परदेशातील शोच्या आगाऊ तिकीट विक्रीची कमाई १३० कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे सिक्वेलपट पहिल्या तीन दिवसांतच अडीचशे कोटींहून अधिक कमाई करेल, असा विश्वास ट्रेड विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
पेड प्रीमिअर शोजमधूनही विक्रमी कमाई करणारा चित्रपट
पेड प्रीमिअर शो ही संकल्पना हिंदी चित्रपटांसाठी नवी नाही. मोठ्या चित्रपटांचे पेड प्रीमिअर शो केले जातात. ‘स्त्री २’, ‘पुष्पा २’ अशा चित्रपटांचे पेड प्रीमिअर शो केले गेले. आत्तापर्यंत पेड प्रीमिअर शोमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘पद्मावत’, ‘थ्री इडियट्स’ आणि ‘स्त्री २’ या चित्रपटांचा उल्लेख केला जातो. पेड प्रीमिअर शोच्या तिकीट विक्रीतून ‘स्त्री २’ने सर्वाधिक म्हणजे १० कोटींची कमाई केली होती. ‘धुरंधर : द रिव्हेंज’ने जवळपास ४०.५४ कोटींची कमाई करत नवाच इतिहास घडवला आहे.
