अभिनेत्री दिया मिर्झाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या पर्यावरणपूरक संदेशामुळे नवीन वादाला तोंड फुटलं असून या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. असं असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं अमित साटम यांची खिल्ली उडवली आहे. त्यांना अंधेरीचा डोनाल्ड डक असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने अमित साटम यांना डिवचलं आहे.
शिवसेनेच्या अखिल चित्रेंनी काय पोस्ट केली आहे?
दिया मिर्झा या केवळ अभिनेत्री नाहीत, तर पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना मिळालेले महत्त्वाचे सन्मान :
- UNEP Goodwill Ambassador for India
- UN Secretary-General’s Advocate for SDGs
- BBC 100 Women (2023)
- Mother Teresa Memorial Award for Social Justice (2022)
- Champions of Change Award (2021)
- Olive Green Young Crusader of the Year
अंधेरीचे आमदार अमित साटम यांचा BMC प्रशासनाशी थेट संबंध नसताना…
राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ साथी’ कार्यक्रमाच्या युवा दूत म्हणूनही त्यांनी काम केले आहे. #BeatPlasticPollution, Wildlife Trust of India आणि Sanctuary Nature Foundation यांसारख्या पर्यावरणविषयक उपक्रम व संस्थांशी त्यांचा सक्रिय संबंध राहिला आहे. मुंबई महानगरपालिकेसोबतही त्यांनी विविध जनजागृती मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. अशा व्यक्तीने मुंबई महापालिकेच्या विनंतीवरून फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृतीचा संदेश दिला, तर त्यात गैर काय? अंधेरीचे आमदार अमित साटम यांचा BMC प्रशासनाशी थेट संबंध नसताना, त्यांच्या आक्षेपानंतर महापालिकेला हा व्हिडीओ का हटवावा लागतो? ते काय सुपर महापौर आहेत?
अंधेरीचा डोनाल्ड डक म्हणत उडवली खिल्ली
एकीकडे स्वतःच्या सामाजिक-राजकीय कार्यक्रमांसाठी सेलिब्रिटींना बोलवायचे आणि दुसरीकडे पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी पुढे आलेल्या दिया मिर्झांच्या संदेशाला विरोध करायचा! दिया मिर्झा यांनी यांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली नाही म्हणून हा आकस आहे का? की त्यांच्या मर्जीतल्या सेलिब्रिटींनाच महापालिकेने जनजागृतीसाठी निमंत्रित करावे, असा आग्रह आहे? की इतर सेलिब्रिटींनीही अंधेरीच्या Donald Duck स्वभावाच्या भाजपाच्या राजकीय ‘मुकरी’ ला ओळखावा, म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे?
दिया मिर्झाने व्हिडीओत काय म्हटलं होतं?
नमस्कार, दिवाळी उत्सव जवळ आला आहे. उत्सव साजरा करत असताना आपल्याला पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हीची काळजी घ्यायची आहे. फटाक्यांमुळे होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण हे आपल्या सगळ्यांसाठी हानीकारक आहे. माझं तुम्हाला आवाहन आहे की दिवाळी आवाजांनी नाही तर आनंदांनी साजरी करा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! हा व्हिडीओ महापालिकेने डिलिट केला असला तरीही एक्स पेजवर तो आहे. अनेकांनी हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. याच व्हिडीओवरून महापौर रितू तावडे यांनीही दिया मिर्झा हिंदू विरोधी असल्याची टीका केली आहे.
पावसाळा संपताच मुंबईच्या वायु प्रदुषणात वाढ झाली आहे. दिवाळीत फटाक्यांचा धूर यामुळं हवेचा स्तर आणखी खालावू शकतो. यावर उपाययोजना म्हणून मुंबई महानगरपालिकेने दिवाळी सेलिब्रिटी कॅम्पेन सुरू केले होते. मात्र आता या महापालिकेच्या या कॅम्पेनवरुन वाद रंगला आहे. भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेतला आहे. मुंबई महापालिकेने एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा मुंबईकरांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत अवाहन करत आहे. दिवाळीत फटाके फोडून ध्वनीप्रदुषण टाळा, असं दिया मिर्झा हिने व्हिडिओत म्हटलं आहे. मात्र महापालिकेने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर अमित साटम यांनी आक्षेप घेतला. ज्यानंतर हा व्हिडीओ डिलिट करण्यात आला. ज्यावरून हा वाद सुरू झाला.
