दिवाळीबाबत दिया मिर्झाने आम्हाला शिकवू नये असं म्हणत भाजपाचे नेते आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी संताप व्यक्त केला. ज्यानंतर मुंबई महापालिकेने अभिनेत्री दिया मिर्झाचा पोस्ट केलेला व्हिडीओ त्यांच्या एक्स पेजवरून डिलिट करण्यात आला आहे. आता महापौर रितू तावडे यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. आम्हाला दिया मिर्झासारख्या लोकांनी दिवाळी कशी साजरी करायची ते शिकवू नये असं त्यांनी म्हटलं आहे. दिया मिर्झा हिंदू विरोधी असल्याचंही रितू तावडे यांनी म्हटलं आहे.
दिया मिर्झाबाबत महापौर रितू तावडे काय म्हणाल्या?
दिया मिर्झा या पहिल्यांदाच वादग्रस्त ठरलेल्या नाहीत. कायमच त्यांनी त्यांच्या ट्वीट आणि पोस्टच्या माध्यमातून आपल्या हिंदू संस्कृतीला आणि देशविरोधी कारवाया चालतात त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे. सिलेक्टिव्ह अजेंडा घेऊन त्या काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणाला खोडण्याचं कामही त्यांनी केलं आहे. अराजक पसरवण्याचं काम करणाऱ्या शक्तींशी हातमिळवणी करण्याचं काम दिया मिर्झा यांनी केलं आहे. त्यामुळे दिया मिर्झा यांनी हिंदू सणांच्या बाबतीत आम्हाला शिकवू नये असं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी म्हटलं आहे.
दिवाळी कशी साजरी करायची ते आम्हाला शिकवू नये
रितू तावडे पुढे म्हणाल्या, दिवाळी कशी साजरी करायची हे दिया मिर्झांनी शिकवू नये. प्रत्येक हिंदू आज यामुळे नाराजच असणार, त्यामुळे दिया मिर्झाला घेऊन जो व्हिडीओ तयार करण्यात आला. ज्या कायम हिंदुत्व आणि भाजपाच्या विचारांच्या विरोधात असतात त्यांचा आम्ही विरोध दर्शवला आहे. दिया मिर्झाने आम्हाला दिवाळीबाबत शिकवण्याचं कारण नाही.
दिवाळी हिंदूचा सण आहे आम्हाला दिया मिर्झाने काही शिकवणं मान्य नाही-रितू तावडे
सन्मानीय उच्च न्यायालयाने हे आदेश दिले होते की प्रदूषण वाढतं आहे. सेलिब्रिटींचे व्हिडीओ पोस्ट करा आणि जनजागृती करा हे न्यायालयाने सांगितलं. दरम्यान माधुरी दीक्षित वगैरे यांचे व्हिडीओ पोस्ट केले गेले आहेत. ज्या सेलिब्रिटींकडून व्हिडीओ पोस्ट करायचे आहेत त्यांची यादी आम्हाला दाखवली गेली नाही. त्यामुळे या संदर्भातलं उत्तर तुम्हाला महापालिका प्रशासनाचा जनसंपर्क विभाग देईल. परंतु अशा पद्धतीचं काम प्रशासनाकडून अपेक्षित नव्हतं. मी या संपूर्ण प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. अमित साटम यांनीही विरोध दर्शवला आहे. दिवाळी हा हिंदूंचा सण आहे तुम्ही फटाके वाजवा किंवा वाजवू नका हे दिया मिर्झाने शिकवणं आम्हाला मान्य नाही.
हिंदू विरोधी कारवाया करणाऱ्यांशी दिया मिर्झांची हातमिळवणी-रितू तावडे
दिया मिर्झांनी हिंदू विरोधी कारवाया करणाऱ्या लोकांशी हातमिळवणी केली आहे. नर्मदा प्रकल्पाच्या विरोधात दिया मिर्झा यांनी भूमिका मांडली. हिंदू धर्माच्या सणांना त्या ट्रोल करत आहेत. लक्झरी कार आणि प्रायव्हेट विमानांतून फिरताना कार्बन फूट प्रिंटचा विसर दिया मिर्झाला पडतो. पण इतर गोष्टींवर त्या नेहमी बोलतात. म्हणजेच त्या सिलेक्टिव्ह अजेंडा घेऊन बोलतात. हिंदू विरोधी भूमिका त्या कायम मांडतात. त्यामुळे दिया मिर्झा यांच्या भूमिकेला आम्ही विरोध दर्शवला आहे.
दिया मिर्झाला ब्लॅक लिस्ट केलंय-महापौर रितू तावडे
पर्यावरणाचा विषय आहे त्यासाठी कलाकारांची गरज आपल्याला आहे. मात्र ती यादी आहे ती आम्हाला दाखवली असती तर त्यातलं दिया मिर्झाचं नाव आम्ही हटवलं असतं. प्रशासनाने जर हा विषय घेतला आहे तर तेच आता या प्रकरणी उत्तर देऊ शकतात. १०० टक्के आम्ही दिया मिर्झाला ब्लॅक लिस्ट केलं आहे. यापुढे महायुतीच्या सत्तेत देश विरोधी कारवाया करणारी जी व्यक्ती बोलणार त्यांना आम्ही विरोधच करणार आहोत. महायुती म्हणून आम्ही या गोष्टीचा विरोध दर्शवणार आहोत. भाजपा आणि आम्ही सगळेजण हिंदू धर्माचा नारा देत काम करतो आमची भूमिका घेत आम्ही करतो आहोत. हिंदू विरोधी कारवायांना जे समर्थन देतील त्यांना आम्ही विरोध दर्शवणारच. जनजागृतीला आमचा विरोध नाही त्यामुळे आम्ही जी यादी नक्की झाली ती महापौर माझ्या टेबलवर यायला हवी होती. त्यामुळे मी या प्रकरणी प्रशासनाला जाब विचारणार आहे असंही रितू तावडे यांनी म्हटलं आहे.
