मुंबई : मधुमेह हा केवळ रक्तातील साखर वाढण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यातून उद्भवणारा डायबिटीक फूट अल्सर हा आता भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक बनला आहे. पायावरील साधी जखम, फोड किंवा भेग याकडे दुर्लक्ष केल्यास ती गंभीर अल्सरमध्ये रूपांतरित होते आणि अनेक रुग्णांमध्ये पाय कापण्याची वेळ येते. त्याहूनही धक्कादायक म्हणजे, अशा रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका कर्करोगासारख्या गंभीर आजारांइतकाच किंवा काही प्रकरणांत त्याहून अधिक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

भारतातील पाच प्रमुख मधुमेह केंद्रांमध्ये करण्यात आलेल्या इडीआया-फोकस या बहुकेंद्रीय अभ्यासाने या समस्येचे भयावह चित्र समोर आणले आहे. तब्बल १४ वर्षे चाललेल्या या अभ्यासात २,८८० डायबिटीक फूट अल्सरग्रस्त रुग्णांचा पाठपुरावा करण्यात आला. या संशोधनानुसार, अल्सर झालेल्या रुग्णांपैकी पाच वर्षांत २२ टक्के, तर दहा वर्षांत तब्बल ७१ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. मधुमेह असला तरी पायाला अल्सर न झालेल्या रुग्णांच्या तुलनेत हा मृत्यूचा धोका अनेक पटींनी अधिक असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

द लॅन्सेटसह अनेक आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासांनुसार, डायबिटीक फूट अल्सर ही केवळ पायाची जखम नसून संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्या, मज्जातंतू आणि प्रतिकारशक्तीवर झालेल्या गंभीर परिणामांचे लक्षण आहे. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, रक्तदूषित संसर्ग (सेप्सिस) आणि अकाली मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि चुकीचा आहार यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत असताना त्यासोबत डायबिटीक फूट अल्सरची समस्याही गंभीर होत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक चार ते पाच मधुमेही रुग्णांपैकी एका रुग्णाला आयुष्यात कधीतरी पायाचा अल्सर होण्याचा धोका असतो.मधुमेहामुळे पायातील नसांची संवेदना कमी होते. त्यामुळे काटा टोचणे, चप्पल घासणे, भाजणे किंवा किरकोळ जखम होणे रुग्णाच्या लक्षातच येत नाही. दुसरीकडे रक्तपुरवठा कमी झाल्याने जखम भरून येत नाही. त्यात संसर्ग वाढल्यास अल्सर तयार होतो. वेळेत उपचार न मिळाल्यास संसर्ग हाडांपर्यंत पोहोचतो आणि अखेर पायाचा काही भाग किंवा संपूर्ण पाय कापण्याची वेळ येते.

‘जामा’ या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अलीकडील संशोधनानुसार ज्या रुग्णांचा मोठा पाय कापावा लागतो त्यांच्यात पुढील काही वर्षांतील मृत्यूदर ७० टक्क्यांपेक्षा अधिक असू शकतो. त्यामुळे अनेक तज्ज्ञ डायबिटीक फूट अल्सरला ‘सायलेंट किलर’ असे संबोधतात.भारतात परिस्थिती अधिक गंभीर ठरण्यामागे जागरूकतेचा अभाव हे प्रमुख कारण असल्याचे डॉक्टर सांगतात. अनेक रुग्ण पायावरील जखमांकडे दुर्लक्ष करतात किंवा घरगुती उपायांवर भर देतात. ग्रामीण भागात तज्ज्ञांची कमतरता, विशेष फूट क्लिनिकचा अभाव आणि उपचारासाठी होणारा विलंब यामुळे अनेक रुग्ण रुग्णालयात पोहोचतात तेव्हा संसर्ग प्रचंड वाढलेला असतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक मधुमेही रुग्णाने दररोज पायांची तपासणी करणे, अनवाणी चालणे टाळणे, योग्य पादत्राणे वापरणे आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पायावर फोड, भेग, सूज, पू, काळपट डाग किंवा संवेदना कमी झाल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डायबिटीक फूट अल्सर हा टाळता येण्याजोगा आजार आहे. वेळेत निदान, आधुनिक जखम उपचार, रक्तातील साखरेवर नियंत्रण आणि नियमित फूट स्क्रीनिंग यामुळे बहुसंख्य रुग्णांचे पाय वाचू शकतात. त्यामुळे मधुमेहावर उपचार करताना केवळ रक्तातील साखर तपासणे पुरेसे नाही तर ‘फूट केअर’ला राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा अविभाज्य भाग बनविण्याची गरज आता अधिक तीव्रतेने व्यक्त होत आहे.

भारतात मधुमेहाचा वाढता बोजा लक्षात घेता, डायबिटीक फूट अल्सर हा केवळ वैद्यकीय विषय राहिलेला नाही. तो सार्वजनिक आरोग्य, कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि लाखो रुग्णांच्या जीवनमानाशी थेट संबंधित प्रश्न बनला आहे. त्यामुळे ‘पायावरील छोटी जखमही जीवघेणी ठरू शकते’ हा संदेश प्रत्येक मधुमेही रुग्णापर्यंत पोहोचविणे ही काळाची सर्वात मोठी गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.