बिगरकरोना आजारांवर लक्ष देण्यासाठी महापालिकेची पावले; रुग्णांची जनजागृती, मार्गदर्शन

प्रसाद रावकर

मुंबई : गेल्या दीड वर्षांमध्ये करोनाव्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांची उपचाराअभावी परवड झाली असून ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आता अन्य आजाराच्या रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी याकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून मधुमेहग्रस्त नागरिकांसाठी जनजागृती, मार्गदर्शन मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेचे दवाखाने आणि आरोग्य केंद्रांमध्ये मधुमेहग्रस्तांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने मधुमेहग्रस्त नागरिकांची संख्या वाढत आहे. मात्र मुंबईत मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर करोनाबाधितांची संख्या वाढत गेली. परिणामी, पालिकेची अवघी आरोग्य सेवा करोनाबाधितांसाठी सज्ज झाली. मात्र करोनाव्यतिरिक्त अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांचे या काळात अतोनात हाल झाले. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे आता अन्य आजारांच्या रुग्णांना उपचार मिळावेत यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मधुमेहींची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पालिकेचे १६३ दवाखाने आणि १७५ आरोग्य केंद्रे आहेत. दवाखाने आणि आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येते. त्याचबरोबर बालकांचे लसीकरणही करण्यात येते. पालिकेच्या आरोग्य सेवेचा प्रचार आणि प्रसाराच्या कामात अग्रस्थानी असलेल्या आरोग्य स्वयंसेविका नेमून दिलेल्या विभागात घरोघरी फिरून विविध आजाराने त्रस्त           

रुग्णांचा शोध घेतात. रुग्णांनी उपचारासाठी पालिकेच्या दवाखाना किंवा आरोग्य केंद्रात जावे यासाठी त्या समुपदेशनही करीत असतात. तसेच मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांतील अनेक नागरिक तेथे उपचारासाठी येतात. आता मधुमेहग्रस्त नागरिकांसाठी आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या हद्दीत दोन किंवा तीन दवाखाने अथवा आरोग्य केंद्रांमध्येही समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तेथे येणाऱ्या मधुमेहींना आजाराबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मधुमेह झाल्यानंतर काय करावे, त्यासाठी आवश्यक सुविधा कोठे उपलब्ध आहे, कोणते उपचार घ्यावे आदींबाबत संबंधितांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

करोनाकाळात अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आरोग्य सेवा कशी देता येईल यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मधुमेहींसाठी दवाखाने, आरोग्य केंद्रांमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येत आहेत. तेथे मधुमेहाबाबत जनजागृती, मार्गदर्शन आणि उपचार करण्यात येतील.

सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त