मुंबई…अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ चे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. आता लोकार्पणानंतर दुसऱ्या दिवशी, अर्थात बुधवारी सकाळी ६ वाजता हा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे बुधवारपासून पूर्व उपनगरवासियांचा डायमंड गार्डन ते मंडाले असा प्रवास केवळ १० मिनिटांत होणार आहे. या अतिजलद प्रवासासाठी प्रवाशांना १० आणि २० रुपये असे तिकीट मोजावे लागणार आहे. दरम्यान, हा टप्पा सेवेत दाखल होत असतानाच मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले कारशेडही सेवेत दाखल झाले आहे. ही देशातील सर्वात मोठी कारशेड ठरली आहे. या कारशेडमध्ये एकाच वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करता येणार आहेत.
दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मार्गिकेचा विस्तार अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. २३.६४ किमी लांबीच्या या उन्नत मेट्रो मार्गिकेमुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरे जोडली जाणार असून या उपनगरांमधील प्रवास अतिजलद होणार आहे. या मार्गिकेचे काम तीन टप्प्यांत करण्यात येत असून मंडाले – डायमंड गार्डन, डायमंड गार्डन – सारस्वत नगर आणि सारस्वत नगर ते अंधेरी पश्चिम असे हे तीन टप्पे आहेत. त्यापैकी डायमंड गार्डन – मंडाले टप्पा बुधवारी वाहतूक सेवेत दाखल होत आहे.
तर ही संपूर्ण २३.६४ किमीची मेट्रो मार्गिका २०२७ मध्ये कार्यान्वित होईल, असे मुख्यमंत्र्यांनी लोकार्पणावेळी जाहीर केले. त्यामुळे २०२७ मध्ये पूर्व आणि पश्चिम उपनगरे मेट्रोने जोडली जातील आणि या दोन उपनगरांतील प्रवासाचे अंतर कमी होईल. बुधवारी कार्यान्वित होणाऱ्या डायमंड गार्डन ते मंडाले या ५.६ किमीच्या टप्प्यात डायमंड गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवनार, मानखुर्द आणि मंडाले अशी पाच मेट्रो स्थानके समाविष्ट आहेत. हा ५.६ किमीचा प्रवास १० मिनिटांत होणार असून यासाठी १० आणि २० रुपये असे तिकीट दर असणार आहेत. सकाळी ६ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत सेवा सुरू राहणार असून शेवटची गाडी १०.३० वाजता सुटणार आहे. प्रत्येक साडेनऊ मिनिटांनी एक मेट्रो गाडी सुटेल. या मार्गावर दररोज २०९ फेऱ्या होतील.
डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा सेवेत दाखल होत असतानाच मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले कारशेडही बुधवारपासून कार्यान्वित होत आहे. मंडालेतील ३०.४५ हेक्टर जागेवर हे कारशेड उभारण्यात आले आहे. यात ७२ स्टेबलिंग लाईन्स असून तिथे एका वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करता येऊ शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे या स्टेबलिंग लाईन्स द्विस्तरीय आहेत.
एका मजल्यावर ३६ आणि दुसऱ्या मजल्यावर ३६ अशा मेट्रो गाड्या उभ्या करता येणार आहेत. या कारशेडमधील रुळांची एकूण लांबी २९ किमी आहे. गाड्यांच्या चाचण्यांसाठी रुळांचे जाळे देशातील सर्वात मोठे असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. या कारशेडमध्ये मेट्रो गाड्यांच्या दुरुस्तीसाठी १० मार्गिका असून गाड्या धुण्यासाठी ऑटो वॉश प्लांट उभारण्यात आला आहे. तसेच कारशेडमध्ये तीन मजली नियंत्रण कक्ष आणि एक प्रशिक्षण केंद्र आहे. ही देशातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक कारशेड असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. तर मंडाले परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने या कारशेडच्या उभारणीदरम्यान पर्यावरणाला कुठेही धक्का पोहोचविण्यात आला नसल्याचेही एमएमआरडीएने स्पष्ट केले. तेव्हा भारतातील सर्वात मोठी कारशेड आता कार्यान्वित झाली असून मेट्रो २ ब मार्गिकेतील गाड्यांचे संचालन या कारशेडमधून केले जाणार आहे.
