फिल्मी स्टाईलने हिरे व्यापाऱ्याकडून सव्वा कोटीचा हिरा पळवणाऱ्या चौघांना वल्लभभाई पटेल रोड पोलिसांनी अटक करून चोरलेला हिरा हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे या टोळीतील मुख्य आरोपीने हिरा चोरी केल्यानंतर आपल्या साथीदारांनाही फसवले होते.
दिल्लीतील एका हिरे व्यापाऱ्याने आपल्याकडील एक हिरा विक्रीसाठी हिरे दलाल ग्यानप्रकाश गौड(५६) यांच्याकडे दिला होता. सतीश मिश्रा याने हिरा खरेदीसाठी आपल्याकडे गिऱ्हाईक आहेत, असे सांगितले. त्यानुसार २६ जून रोजी गिरगावच्या मथुरा लॉज येथे या हिऱ्याच्या सौद्याचा कार्यक्रम ठरला होता. या हिऱ्याची किंमत १ कोटी १४ लाख रुपये आहे. मात्र त्यावेळी गिऱ्हाईक बनून आलेल्या तिघांनी गौड यांच्यावर चॉपरने वार केला आणि हिरा घेऊन पळ काढला. वल्लभाई पटेल मार्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून मिश्रा यास अटक केली.
मात्र हिरा घेऊन लंपास झालेले तीन साथीदार फरार होते. गुन्हे शाखा २ च्या पथकाने शरद पाबरेकर, गोविंद नांदगावकर आणि शंकर काजरे या तिघांना अटक केली. विशेष म्हणजे पाबरेकर याने झटापटी दरम्यान हा हिरा गहाळ झाल्याचे सांगून आपल्याच साथीदारांना फसवले होते.