मुंबई : आखाती देशांतील संघर्षादरम्यान गेल्या महिन्यात ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला भारतीय खलाशी दीक्षित सोलंकी याचे पार्थिव परत मिळण्याच्या मागणीसाठी त्याच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दीक्षित सोलंकीचे वडील अमृतलाल आणि बहीण मिताली सोलंकी यांनी ही याचिका केली आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट माहिती न मिळाल्यामुळे केंद्र सरकारला दीक्षित याचे पार्थिव भारतात आणण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. सोलंकी कुटुंबीयांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व तपास आणि न्यायवैद्यक अहवालांची माहितीही देण्याची मागणी देखील याचिकेद्वारे केली आहे.
याचिकेत परराष्ट्र मंत्रालय, बंदरे, जलमार्ग वाहतूक मंत्रालय, सागरी वाहतूक महासंचालनालय आणि ”एमटी एमकेडी व्योम” या जहाजाचे व्यवस्थापन करणाऱ्या व्ही शिपिंग इंडिया लिमिटेड कंपनीलाही प्रतिवादी करण्यात आले आहे. सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार हा व्यक्तीच्या मृत्युनंतरही अबाधित राहतो.
त्यामुळे, मुलाचे पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. कुटुंबीयांनाही पार्थिव स्वीकारण्याचा आणि अंत्यसंस्काराचा विधी पार पाडण्याचा अधिकार आहे. समुद्रात मृत्यू झाल्यास मृतदेह योग्यरित्या मायदेशी परत आणण्याच्या सागरी नियमावली व मार्गदर्शक तत्त्वांतर्गत असलेल्या कायदेशीर दायित्वांचाही याचिकेत आधार घेण्यात आला आहे.
वस्तुस्थितीची अचूक माहिती मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार खेटे घालूनही अधिकाऱ्यांकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप देखील सोलंकी कुटुंबीयांनी याचिकेत केला आहे. दीक्षितचा मृतदेह शोधून मायदेशी आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याचा दावा कंपनीकडून गेल्या महिन्याभरापासून केला जात असल्याचेही कुटुंबीयांनी याचिकेत म्हटले आहे.
प्रकरण काय ?
अमेरिका – इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या किनाऱ्याजवळील ”एमटी एमकेडी व्योम” या तेलवाहू जहाजावर ४ मार्च रोजी स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनचा हल्ला झाला. त्यामुळे झालेल्या स्फोटात इंजिन कक्षाला आग लागली. या हल्ल्यात मूळचा दीवचा असलेल्या आणि कांदिवली येथे राहणाऱ्या दीक्षित सोलंकी याचा मृत्यू झाला. आखाती देशांतील संघर्षात मृत्युमखी पडलेला दीक्षित हा पहिला भारतीय होता.
