मुंबई : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरने पैशांअभावी उपचार करण्यास नकार दिल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्युप्रकरणी सोमवारी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) कार्यालयात सुनावणी झाली. यावेळी भिसे कुटुंबियांनी त्यांची बाजू मांडली, तर डॉ. सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिल्याने त्यांना पुढील तारखेला बोलावण्यात येणार आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना अनामत रक्कम भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे गर्भवती महिलेवर उपचार करण्यात आले नाहीत. परिणामी या महिलेचा मृत्यू झाल्याने पुण्यासह राज्यभरात पडसाद उमटले. या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉ. सुश्रुत घैसास यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले होते. डॉ. घैसास यांनी स्पष्टीकरण सादर केल्यानंतर एमएमसीने नेमलेल्या चौकशी समितीसमोर डॉ. घैसास आणि मृत महिलेच्या कुटुंबियांची सोमवारी सुनावणी ठेवली होती. यावेळी मृत महिलेच्या कुटुंबियांनी घडलेली संपूर्ण घटना चौकशी समितीसमोर मांडली केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तनिषा भिसे या गर्भवती महिलेला ज्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, तिच्यावर तेथे करण्यात आलेले उपचार याबाबत सर्व रुग्णालयाकडून अहवाल मागविण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचा आणि पोलिसांचा चौकशी अहवाल मागविण्याचा निर्णय एमएमसीने स्थापन केलेल्या चौकशी समितीने घेतला आहे.
या सुनावणीसाठी डॉ. सुश्रुत घैसास हे उपस्थित राहू शकले नाहीत. डॉ. सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी याबाबत एमएमसीला कळवून पुढील तारीख देण्याची विनंती केली होती. या विनंतीनुसार त्यांना पुढील तारीख देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी दिली.
दरम्यान, डॉ. सुश्रुत घैसास यांची सुनावणी झाल्यानंतर आणि सर्व रुग्णालयाचे अहवाल सादर करण्यात आल्यानंतर त्यांचा अभ्यास करून चौकशी समिती आपला अभिप्राय सादर करणार आहे. त्यानंतर या प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती डॉ. विंकी रुघवानी यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे या महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांना १० लाख रुपये भरण्यासाठी सांगितले. मात्र, तीन लाख रूपये देतो, असे सांगूनही तनिषा भिसे या महिलेवर उपचार सुरू केले नाहीत. पैसे नसल्याने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरूनच गर्भवती महिलेला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू शकली नाही. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने तनिषा भिसेचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर केला होता.
याप्रकरणी सरकारने नेमलेल्या समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर ठपका ठेवला आहे. यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला. या प्रकरणामुळे पुण्यासह राज्यातील सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.