मुंबई : स्पर्धक अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला अभिनेता आणि ‘हाऊस अरेस्ट’ या शोचा सूत्रसंचालक एजाज खान याला अटकपूर्व जामीन देण्यास दिंडोशी सत्र न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. आरोपांचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेता एजाजची कोठडी आवश्यक आहे, असे दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश दत्ता ढोबळे यांनी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळताना नमूद केले.
आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा एजाजने अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची मागणी करताना केला होता. तक्रारदार तरूणीला आपण आधीच विवाहित असल्याचे माहीत होते. त्यामुळे आमच्यातील शरीरसंबंध हे परस्पर सहमतीने होते, असा दावाही एजाजने केला होता. आपला दावा सिद्ध करण्यासाठी एजाज याच्यातर्फे काही व्हॉट्स ॲप संदेश आणि ध्वनीफिती न्यायालयासमोर सादर करण्यात आल्या. त्यात, तक्रारदार तरूणीने त्यांच्यातील संबंध परस्पर सहमतीने होते हे मान्य करताना तक्रार मागे घेण्यासाठी आपल्याकडे पैशांची मागणी केल्याचे म्हटले होते, असे एजाज याच्या वतीने न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला गेला.
दुसरीकडे, एजाज याचा मोबाइल जप्त करण्यासाठी, व्हॉट्स ॲप संदेश आणि भ्रमणध्वनी नोंदीची पडताळणी करण्यासाठी त्याची अटक करणे आवश्यक आहे. शिवाय, एजाज याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे, त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तो पुरावे नष्ट करू शकतो किंवा तक्रारदार तरूणी आणि अन्य साक्षीदारांना धमकावू शकतो, असा दावा पोलिसांतर्फे करण्यात आला. तसेच, एजाज याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करण्यात आली.
न्यायालयाने काय म्हटले ?
याप्रकरणी दाखल प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) घटना घडल्याच्या विशिष्ट तारखा, ठिकाणे आणि परिस्थिती उघड केली आहे, त्यानुसार, एजाज याने केवळ लग्नाचेच नाही, तर तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला व्यावसायिक मदत आणि आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देखील दिले होते. त्यामुळे, तक्रारदार आणि एजाज यांच्यात संमतीने शरीरसंबंध होते एवढ्यापुरते या प्रकरणाकडे पाहता येणार नाही. शरीरसंबंधांसाठीची संमती फसवणूक करून किंवा तथ्यांचे चुकीचे वर्णन करून मिळवली गेल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असे न्यायालयाने एजाज याला दिलासा नाकारताना नमूद केले. तक्रारदार तरूणी सज्ञान असली तरी तिने केलेल्या आरोपांचा विचार करता शरीरसंबंधांसाठीची तिने दिलेली संमती स्वेच्छेने असल्याचे दिसून येत नसल्याचेही न्यायालयाने म्हटले. एजाज याची वैद्यकीय तपासणी आणि इतर डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी त्याला अटक करणे आवश्यक आहे. तसेच, अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास एजाज याच्याकडून पुरावे नष्ट करण्याची आणि तक्रारदार तरूणीसह अन्य साक्षीदारांना धमकावण्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचेही न्यायालयाने एजाज याचा अर्ज फेटाळताना म्हटले.