जयेश शिरसाट
व्यवसाय वृद्धीसाठी व्यावसायिक, व्यापारी किंवा कंपन्याच चिकित्सक असतात, असे नाही. गुन्हेगारी प्रवृत्तींकडूनही समांतर अभ्यास, निरीक्षण सुरू असते. त्यातून आपले ईप्सित कसे साध्य होईल याचा विचार गुन्हेगार सातत्याने करीत असतात. या अभ्यासातून ते गुन्ह्य़ांसाठी योग्य संधी निर्माण करतात. गेल्या आठवडय़ात दिंडोशी पोलिसांनी अशाच चिकित्सक, संधिसाधू भामटय़ांच्या टोळीला बेडय़ा ठोकल्या.
प्रदीप मेंडसुरे(६०) घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत १ फेब्रुवारीला दिंडोशी पोलीस ठाण्यात आले. मला लुटले, परकीय चलन हिसकावून पळून गेले, असा त्यांचा सारखा घोषा सुरू होता. दिंडोशी पोलिसांनी त्यांना शांत करत नेमकी घटना विचारली. गोरेगाव येथील परदेशी चलन पुरवणाऱ्या अधिकृत वित्त संस्थेत काम करणारे मेंडसुरे घटना सांगू लागले. सकाळीच त्यांच्या मालकाला हार्दिक नावाच्या व्यक्तीचा फोन आला. तो परदेशात जाणार होता. त्याला तातडीने चार हजार अमेरिकन डॉलर आणि दोन हजार सिंगापूर डॉलर हवे होते. संध्याकाळी तो विमान पकडणार होता. व्यवहार ठरला आणि मालकाने त्याच्या मागणीनुसार परदेशी चलन मेंडसुरे यांच्या हाती दिले. गोरेगाव पूर्वेकडील गोखले मार्गावरील धीरज व्हॅली इमारतीत हार्दिकला परदेशी चलन द्यायचे होते. इमारतीजवळ जाताच मेंडसुरे यांनी हार्दिकला नेमका पत्ता म्हणजे इमारतीतील कोणता भाग, कितवा मजला आदी जाणून घेण्यासाठी फोन केला. हार्दिकने इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या कारमध्ये त्यांना येण्यास सांगितले. घाईत असल्याने कारमध्येच व्यवहार करू, असे सुचवले. कारमध्ये चार व्यक्ती होत्या. त्यातील दोघांनी सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून मेंडसुरेंवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. दम दिला. परवाना कुठे आहे, नोंदी ठेवता का, आरबीआयला व्यवहार कळवता का, आदी प्रश्न सुरू झाले. मेंडसुरे यांना विनाकारण घाम फुटला. पुढल्या काही क्षणांत त्यांनी त्यांच्याकडील परदेशी चलन हिसकावून घेतले आणि त्यांना अंधेरी येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर कारमधून उतरवले. त्यानंतर क्षणार्धात ते तथाकथित सीबीआय अधिकारी पुढे निघून गेले.
हे सर्व ऐकून दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याच्या सूचना केल्या. अशा पद्धतीने परदेशी चलन हिसकावण्याचे प्रकार पूर्वी विमानतळाशेजारी सर्रास घडत होते. परदेशी पर्यटकांची भारतीय चलन देण्याच्या बहाण्याने लूट होत होती, हे व्हनमाने यांना माहिती होते. पण वित्त संस्थेने ग्राहकाला घरपोच परदेशी चलन पुरवणे, तेच चलन अशापद्धतीने लुटणे, हा प्रकार नवा होता. व्हनमाने यांनी तातडीने आपल्या अन्वेषण पथकाला या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक गणेश पवार, उपनिरीक्षक नितीन पटेकर, पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील, पोलीस नाईक अनिल वारे, राजेश घडशी, शकील शेख, शिपाई अमोल जाधव, संतोष चव्हाण, गोरख देशमुख हे पथक तपासासाठी सज्ज झाले.
गोखले मार्ग ते अंधेरीपर्यंतच्या १६ सीसीटीव्हींचे चित्रण तपासले. त्यात आरोपींची कार दिसली. कारचा नोंदणी क्रमांक मिळाला. या कारचा मालकच गुन्हा घडला तेव्हा ती चालवत होता. हे समजताच पथकाने त्याला बेडय़ा ठोकल्या. त्याचा या गुन्ह्य़ाशी थेट संबंध नव्हता. मात्र त्याने गुन्ह्य़ाची माहिती पोलिसांपासून दडवली होती. त्याच्या चौकशीतून आरोपींनी ‘जस्ट डायल’द्वारे कार भाडय़ाने घेतल्याची माहिती पुढे आली. मग आरोपींना कुठून गाडीत घेतले, कुठे फिरवले, कुठे सोडले आदी माहिती घेऊन तेथील सीसीटीव्ही चित्रण पथकाने मिळवले. त्यातून आरोपींचे चेहेरे स्पष्ट झाले. त्याआधारे अभिलेख तपासण्याचे काम सुरू झाले. चौकशी दरम्यान जस्ट डायलवरूनच आरोपींनी मेंडसुरे काम करत असलेल्या वित्त संस्थेचा संपर्क क्रमांक मिळवल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणात जस्ट डायल हा सामाईक धागा होता. तो पथकाने अचूक पकडला. आरोपी अभिलेखावर नव्हते. खबऱ्यांकडूनही त्यांची ओळख पटत नव्हती. त्यांच्याबाबत माहिती मिळत नव्हती. पण ते या पद्धतीने आणखी गुन्हे करणार, ही खात्री मात्र पथकाला निश्चित होती. त्यामुळे आरोपींना पकडण्यासाठी गळ टाकून वाट पाहावी लागणार होती. पथकाने जस्ट डायलच्या माध्यमातून पश्चिम उपनगरातील परदेशी चलन पुरवणाऱ्या २३ वित्त संस्थांची माहिती मिळवली. प्रत्येक संस्थेला विश्वासात घेतले. फोनवरून, ऑनलाईन पद्धतीने परदेशी चलन घरपोच पुरवण्याची मागणी करणारे आणि विशेषत: अर्धवट पत्ता सांगणाऱ्या ग्राहकांची माहिती तातडीने पुरवण्यास सांगितले.
पोलिसांची ही क्लृप्ती अचूक ठरली. गेल्या आठवडय़ात विलेपार्ले येथील एका संस्थेने दिंडोशी पोलीस पथकाशी संपर्क साधला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक ग्राहक आमच्या संस्थेच्या संपर्कात आहे. त्याने परदेशी चलनाची मागणी केली आहे. मात्र पत्ता अर्धवट दिला आहे, ही माहिती मिळताच पथक कामाला लागले. विलेपार्ले येथे सापळा रचण्यात आला. या वित्त संस्थेच्या कर्मचाऱ्याला लुटण्याच्या प्रयत्नात असतानाच दबा धरून बसलेल्या दिंडोशी पोलिसांनी दोन तरुणांची गचांडी आवळली. मेंडसुरे यांना लुटणाऱ्यांमध्ये या दोघांचा समावेश होता. जेठाराम माली ऊर्फ जयेश, राजकुमार दुबे अशी दोघांची नावे. जेठारामनेच हार्दिक या नावे मेंडसुरे यांच्या संस्थेत फोन केला होता. विलेपार्लेच्या संस्थेकडेही त्यानेच परदेशी चलनाची मागणी केली होती. जेठाराम अस्खलीत गुजराती बोलतो. त्यामुळे फोनवर बोलण्याचे काम त्याच्याकडे होते. दुबेव्यतिरिक्त दोघे पोलीस वाटावेत अशा देहयष्टीचे साथीदार. त्यांना मराठी, हिंदी व्यवस्थित बोलता येते. जेठाराम चोरीचे फोन खरेदी-विक्री करतो. जस्ट डायलवरून गाडी भाडय़ाने घेण्यासाठी आणि वित्त संस्थांशी संपर्क साधण्यासाठी तो चोरीच्या फोनचा वापर करत होता. निर्जन आणि मुख्य रस्त्याजवळील एखादी इमारत निवडून त्या ठिकाणी ही टोळी परदेशी चलन मागवत होती. चलन घेऊन येणाऱ्या कामगाराला घाबरवणे आणि चलन हिसकावून पळून जाणे या क्रिया सहज होत्या. याच पद्धतीचा वापर करून या टोळीने पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, जुहू, अंबोली आणि अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वित्त संस्थांचे परकीय चलन लुटले. मात्र यापैकी एकाही वित्त संस्थेने पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. त्यामुळे ही टोळी मोकाट होती. दिंडोशी पोलिसांनी पकडले नसते तर या टोळीने असे आणखी गुन्हे निश्चितपणे केले असते. ऑनलाइन व्यवहारांमुळे आणि मोठय़ा संस्था या व्यवसायात उतरल्याने परदेशी चलन पुरवणारे अधिकृत, अनधिकृत छोटे दलाल, छोटय़ा वित्त संस्थांच्या व्यवसायावर परिणाम झाला. व्यवसायात टिकून राहण्यासाठी, ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी घरपोच डिलेव्हरीची सेवा सुरू केली. याच सेवेची संधी जेठाराम आणि त्याच्या टोळीने घेतली. अद्ययावत सुरक्षा व्यवस्थेमुळे दुकानात जाऊन चलन लुटणे जिकिरीचे होते. अशा संस्थाच चलन सांगितल्या ठिकाणी देतात, ही माहिती मिळाल्याने सोयीच्या ठिकाणी गुन्हा करणे टोळीला सहज सोपे ठरले. अनधिकृत संस्था लुटीची तक्रार करून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणार नाहीत, हा विश्वासही टोळीला होता.