मुंबई : नमित मल्होत्रा प्रस्तुत आणि नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या हिंदी चित्रपटाची पहिली झलक एकाच वेळी भारतातील ९ शहरात दाखविण्यात येत आहे. मुंबईतील लोअर परळ येथील पीव्हीआर चित्रपटगृहात हा कार्यक्रम होत आहे. या चित्रपटाची पहिलीवहिली झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

‘रामायण : द इंट्रोडक्शन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाची पहिलीवहिली झलक गुरूवार, ३ जुलै रोजी मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि कोची या शहरांमध्ये भव्यदिव्य सोहळ्यात दाखविण्यात येणार आहे. मुंबईतील लोअर परळ येथील पीव्हीआर चित्रपटगृहात ही पहिलीवहिली झलक दाखविण्यात येत असून ‘रामायण : द इंट्रोडक्शन’ नेमके काय असणार ? यासंदर्भात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पीव्हीआर चित्रपटगृहाच्या आवारात दोन्ही बाजूंनी मोठ्या रांगा लागल्या असून उत्कंठावर्धक वातावरण पाहायला मिळत आहे. यामध्ये विविध वयोगटातील प्रेक्षकांसह महाविद्यालयीन तरुण – तरुणींचा मोठा समावेश आहे.

‘दंगल’, ‘छिछोरे’सारखे यशस्वी चित्रपट देणाऱ्या नितेश तिवारी हे ‘रामायण : द इंट्रोडक्शन’ चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असल्यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आहे. या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशभरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ‘रामायण : द इंट्रोडक्शन’ चित्रपटासंदर्भात माहिती पोहोचवण्यासाठी एकाच वेळी ९ शहरांत पहिली झलक दाखविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा चित्रपट भारत आणि परदेशातील कलाकार व तंत्रज्ञांच्या साथीने भव्य स्तरावर तयार करण्यात येत आहे.