मुंबई : ‘परिणीता’, ‘मर्दानी’सारखे नावाजलेले चित्रपट देणारे लेखक- दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सरकार यांच्याबरोबर काम केलेले बॉलीवूडमधील अनेक नामांकित कलाकार त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सांताक्रुझ स्मशानभूमीत उपस्थित होते. प्रदीप सरकार यांची प्रकृती गेले काही दिवस ठीक नव्हती. शुक्रवारी पहाटे त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ३च्या सुमारास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकीर्दीत केलेले मोजके चित्रपट नायिकाप्रधान होते. सरकार यांनी विधू विनोद चोप्रा यांच्या प्रॉडक्शन कंपनीत जाहिरात दिग्दर्शक म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली होती. १७ वर्षे जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी स्वत: स्वतंत्रपणे जाहिरात दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘परिणीता’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. योगायोगाने अभिनेत्री विद्या बालनचेही याच चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण झाले. या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी ‘लागा चुनरी मै दाग’, ‘लफंगे पिरदे’, ‘मर्दानी’, ‘हेलिकॉप्टर इला’ असे मोजकेच, पण वेगळा आशय देणारे चित्रपट केले. ‘झी ५’वरील ‘दुरंगा’ या वेबमालिकेचेही त्यांनी दिग्दर्शन केले होते. अभिनेत्री दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, विद्या बालन, दिया मिर्झा, यांनी सरकार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.