अपूर्ण राहिलेल्या चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने चार आठवडय़ांची मुदतवाढ दिली आणि चित्रपट निर्मात्यांनी मोकळा श्वास घेतला. पण, अजूनही संजयने नेमके कोणते चित्रपट पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मागितली, याबाबत गोंधळ आहे.
संजय दत्तकडे सध्या ६-७ बिग बजेट चित्रपट आहेत. त्यात टी. पी. अग्रवाल यांचा ‘पोलीसगिरी’, राजकुमार हिरानीचा ‘पीके’, अपूर्व लाखियाचा ‘जंजीर’ आणि करण जोहरच्या ‘उंगली’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय, ‘मुन्नाभाई चले दिल्ली’ आणि संजय दत्तच्या होम प्रॉडक्शनखाली तयार होणारा ‘हसमुख पिघल गया’ हे दोन चित्रपट त्याच्यासाठी रखडले होते. त्यापैकी, मुन्नाभाईचा सिक्वल हा संजय दत्त शिक्षा भोगून आल्यानंतरच सुरू करणार, अशी घोषणा निर्मात्यांनी केली असल्याने ती कोंडी सुटली आहे. सध्या प्रॉडक्शनची सूत्रे संजयची पत्नी मान्यताने हाती घेतली आहेत. संजयला मुदतवाढ मिळाली तर ‘हसमुख पिघल गया’मधली भूमिका संजय करणार, असे ठरले होते. मात्र, संजयला महिन्याभराचीच मुदत मिळाली आहे. त्यामुळे तो ही भूमिका करू शकेल की नाही, हा प्रश्न अजून सुटलेला नाही. आपण त्याच्याशी सातत्याने संपर्कात असून येत्या तीन-चार दिवसांत त्याबाबतचा निर्णय स्पष्ट होईल, अशी माहिती चित्रपटाच्या दिग्दर्शक सेजल शाह यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.