मुंबईत एक डोकं चक्रावून टाकणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. २० वर्षांच्या एका मूकबधिर मुलीवर काही नराधमांनी बलात्कार केला होता. यानंतर सदर पीडिता गर्भवती राहिली. आरोपीची ओळख पटविण्यासाठी तब्बल १६ जणांची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यानंतर ज्याच्याशी डीएनए नमुने जुळले, ते पाहून तपासकर्त्यांनाही धक्का बसला. जन्मदात्या बापाशीच डीएनए जुळल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
ऑक्टोबर २०२५ मध्ये सदर पीडिता पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे आली होती, तेव्हा ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यानंतर डॉक्टरांनी ही बाब पोलिसांच्या लक्षात आणून दिली. पीडिता मूकबधिर असल्यामुळे तिच्याशी संवाद साधण्यात आणि नेमके आरोपी कोण आहेत, तसेच तिच्याबरोबर नेमके काय झाले? याचा तपास करण्यात पोलिसांना अडचण येत होती.
तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की, पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. यामुळे पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून पीडितेच्या संपर्कात आलेले नातेवाईक आणि तिच्या आजूबाजूच्या तब्बल १६ लोकांचे डीएनए नमुने गोळा केले. यानंतर पीडितेचा गर्भपात करण्यात आला आणि गर्भाचे नमुने फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविण्यात आले.
२७ जानेवारी रोजी फॉरेन्सिक तज्ज्ञांनी गर्भाचे डीएनए नमुने पीडितेच्या वडिलांच्या डीएनएशी जुळल्याचा अहवाल दलिा. त्यानंतर पोलिसांनी वडिलांना (वय ४८) अटक केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही काळापूर्वी पीडितेच्या परिसरातील १६ वर्षांचा मुलगा आणि एका ३२ वर्षीय पुरुषाला अटक करण्यात आली होती. पीडितेने केलेल्या वर्णनानुसार त्यांची अटक झाली होती.
पोलिसांनी पुढे सांगितले की, भीतीच्या सावटाखाली असल्यामुळे पीडित तरूणीने आपल्या वडिलांचे नाव उघड केले नव्हते. बाल हक्क आणि दिव्यांग सहकार्य संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या समुपदेशनादरम्यान पीडितेने कबुल केले की, वडिलांनीही तिच्यावर अत्याचार केला होता.
तपासकर्त्यांनी पुढे म्हटले की, पीडितेवर घरात आणि अज्ञात ठिकाणी कुणी नसताना वडिलांकडून अत्याचार करण्यात आला. पीडितेच्या परिस्थितीचा आणखी कुणी फायदा उचलला आहे का, याचाही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

