मुंबई : सत्ता जाताच महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने परस्पर दावा केल्याने काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीने नापंसती व्यक्त केली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभेचे उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे आहे. विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा केला होता. पण शिवसेनेने उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र दिले आणि लगेचच दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावर अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले या काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला.

विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करताना शिवसेनेने मित्रपक्षांना विश्वासात घेतले नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पदावर काँग्रेसचा दावा अद्याप कायम असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी एकत्र असताना शिवसेनेने परस्पर विरोधी पक्ष नेतेपदासाठी त्यांच्या उमेदवाराचे नाव देणे, हे चुकीचं आहे. हे पत्र देण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घेणे आवश्यक होते, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीत एकोपा राहावा हीच आमची अपेक्षा असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिवसेनेच्या भूमिकेबद्दल नापसंती व्यक्त केली. ते म्हणाले की दानवे यांची नियुक्ती करताना काँग्रेस पक्षाला विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे या निर्णयास आमचा विरोध असेल. त्यांनी चर्चा करायचीच नाही, अशी भूमिका घेतली असेल तर त्याला काय करणार?, पण एका विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सहभागी झालो होतो. आता त्यांना चर्चा करायची आहे की नाही हे त्यांनी ठरवावे.

अजित पवार, पाटील, भुजबळ मातोश्रीवर

महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ या नेत्यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. शिवसेनेत चिन्हावरून सुरू झालेल्या वादात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे गटाचे कान टोचून शिवसेनेची बाजू उचलून धरली होती.