मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आठवडा होत आला तरी महापौर कोण होणार हे निश्चित होऊ शकलेले नाही. मात्र त्याच वेळी शिवसेनेने (ठाकरे) गटनेतेपदी केलेली नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ‘मातोश्री’ने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेते पद बहाल केले असले तरी त्याविरोधात पक्षामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. शिवसेनेतील (ठाकरे) ज्येष्ठ मंडळी निवडून आलेली असताना त्यांना डावलून करानापूर्व आणि त्यानंतरच्या काळात आरोप झालेल्या व्यक्तीला गटनेते पद दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
तडफदार आणि आक्रमक व्यक्तीमत्त्व अशी किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे. करोनाकाळानंतर शिवसेनेवर (ठाकरे) झालेल्या आरोपांना सडेतोड उत्तर त्यात देत होत्या. मात्र करोनाकाळातील काही कामांवरून त्यांच्यावरही आरोप करण्यात आले. तसेच झोपू योजनेतील गाळ्यांवरूनही त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात किशोरी पेडणेकर शिवसेनेला (ठाकरे) सोडचिठ्ठी अशीही एक चर्चा सुरू होती. मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत उमेदवारीवरून त्यांच्या प्रभागात शिवसैनिकांचा उद्रेकही झाला होता. यावेळीही त्यांच्याबद्दल प्रभागात नाराजीचा सूर उमटत होता. तिकीट वाटपाच्या वेळी पक्षाने त्यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली. असे असतानाही निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ घालण्यात आल्यामुळे शिवसेनेतील (ठाकरे) अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकले, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आदी दिग्गज मंडळी निवडून आली. यापैकी श्रद्धा जाधव यांच्याविरोधात प्रभागात बंडखोरी झाली. विठ्ठल लोकले मधल्या काळात काँग्रेसमध्ये जाऊन परत आले. मात्र उर्वरित मंडळींपैकी एकाचा गटनेतेपदासाठी विचार झाला असता तर पक्षात नाराजीचा सूर आळवण्याची वेळच आली नसती, अशी शिवसेनेत (ठाकरे) चर्चा सुरू आहे.
सर्वच पदे वरळीत
वरळी विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेतील दोन आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर, बेस्ट समिती अध्यक्षपद भूषविलेले ज्येष्ठ माजी नगरसेवक अशी पदाधिकाऱ्यांची मोठी फौज आहे. आता पुन्हा शिवसेनेचे (ठाकरे) मुंबई महानगरपालिकेतील गटनेतेपद वरळी विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून निवडून आलेल्या किशोरी पेडणेकर यांना बहाल करण्यात येत आहे. पदांची खिरापत वरळीतच वाटणार का, असा सवाल अनेक शिवसैनिक करू लागले आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील शिवसेना (ठाकरे) कार्यकर्त्यांचाही विचार व्हायला हवा होता, अशी व्यथा शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.
