मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या सवलतीधारक प्रवाशांमुळे विनासवलत प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. तिकीटाचे पूर्ण पैसे भरून देखील प्रवाशांना एसटीमध्ये उभे राहण्यासाठी देखील जागा शिल्लक नसायची. दररोज दाटीवाटीच्या आणि गर्दीच्या प्रवासाला कंटाळून या प्रवाशांनी एसटीला पाठ दाखवली होती. त्यामुळे एसटीच्या एकूण प्रवासी संख्येत घट झाली. परिणामी, एसटीची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटीच्या सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट दरात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी प्रवाशांना सुमारे १५ टक्क्यांपर्यंत तिकीटदरात सवलत देण्यात येण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे.

एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० किमी पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. या सोयीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. १ जुन रोजी एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिन सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.

आषाढी एकादशी व गणपती उत्सवात प्रवाशांना लाभ

आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येईल. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत १जुलैपासून लागू होत आहे. परंतु, जादा बससाठी ही सवलत लागू नसेल. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ई-शिवनेरीच्या प्रवाशांना लाभ

मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाइल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना १५ टक्के सवलत मिळू शकते.