scorecardresearch

पालींच्या तीन नव्या प्रजातींचा शोध ; गोल बुबुळाच्या प्रजातींमध्ये भर; आणखी अभ्यासास वाव

जगभरात या जातीच्या शंभरपेक्षा अधिक प्रजाती आढळतात. भारतात ६८ प्रजातींची नोंद आतापर्यंत झालेली आहे.

मुंबई : कर्नाटकातून पालींच्या तीन नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’चे अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल यांनी हे संशोधन केले आहे. निमास्पिस टायग्रीस, निमास्पिस सक्लेशपुरेनसिस आणि निमास्पिस विजयाई असे या पालींचे नामकरण करण्यात आले आहे.

जगभरात या जातीच्या शंभरपेक्षा अधिक प्रजाती आढळतात. भारतात ६८ प्रजातींची नोंद आतापर्यंत झालेली आहे. शरीरशास्र आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर या पाली वेगळय़ा असल्याचे सिद्ध झाले आहे. सोमवारी हा शोधनिबंध ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या आतंरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला आहे.

निमास्पिस टायग्रीस ही प्रजात ‘मैसुरेंसिस’ या गटातील असून ती कर्नाटकातील चिकबल्लापुर जिल्ह्यातील कैवारा या ठिकाणी जून २०१९ रोजी आढळली होती. या प्रजातीच्या नरांमध्ये वाघासारखी पट्टेदार रचना दिसून येते. ही प्रजात झुडुपे असलेल्या जंगलात ग्रॅनाईट खडकावर समुद्रसपाटीपासून साधारण ९१० मीटर उंचीवर आढळते. निमास्पिस सक्लेशपुरेनसिस ही प्रजात ‘गोवाएनसीस’ या गटातील असून ती हस्सन या जिल्ह्यातील सक्लेशपुर या गावात जून २०१९ रोजी आढळली होती. ही प्रजात अर्ध सदाहरित प्रकारच्या जंगलात नदीच्या कडेने, झाडाच्या खोडांवर आणि घरांच्या िभतींवर समुद्रसपाटीपासून साधारण ८५० मीटर उंचीवर आढळते.

विजयाई ही प्रजात कोडागु जिल्ह्यात डिसेंबर २०२१ रोजी आढळली होती. ही प्रजाती ‘गोवाएनसीस’ या गटातील आहे. या प्रजातीला दिलेले विजयाई हे नाव पहिल्या भारतीय सरीसृप महिला संशोधिका जे. विजया यांनी कासवांवर केलेल्या संशोधन कार्याच्या प्रित्यर्थ देण्यात आले आहे. ही प्रजात कॉफीच्या मळय़ांनी वेढलेल्या घरांच्या िभतींवर समुद्रसपाटीपासून साधारण १ हजार २५० मीटर उंचीवर आढळते. मांडीवरील ग्रंथींची व त्यामधील विनाग्रंथी खवल्यांची संख्या, शरीरावरील उंचवटयांची तसेच खवल्यांची संख्या, रंग, इतर शारीरिक वैशिष्टय़े आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर तिन्ही प्रजाती नवीन असल्याचे सिद्ध झाले आहे.

नव्या संशोधनामुळे..

भारतातील गोल बुबुळाच्या पालींची संख्या आता ७१ झाली आहे. भारतात अजूनही नवीन प्रजातींचा शोध लागत असल्याने पाली, सरपटणारे प्राणी आणि एकूणच पर्यावरणीय अभ्यासाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नाही, हेच सिद्ध होत असल्याचे यांचा अभ्यास करणाऱ्या  संशोधकांनी सांगितले.

थोडी माहिती.. नव्याने शोध लागलेल्या तिन्ही प्रजाती या ‘गोल बुबुळाच्या पाली’ या जातीमधील आहेत. या जातीच्या प्रजाती भारतासह श्रीलंका, म्यानमार, थायलंड, सुमात्रा आणि त्याच्या जवळपासच्या बेटांवर आढळतात.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Discovery of three new species of lizard zws