मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक यांच्यासह सर्वच प्रश्नांवर चर्चा केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलतना दिली.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी कारवाई केल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन ईडीच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार केली. मात्र त्याआधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक करून तुरुंगात टाकले आहे, त्यांच्याबाबत पवार पंतप्रधानांशी काही बोलले नाहीत, अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात माध्यमांनी अजित पवार यांचे त्याकडे लक्ष वेधले असता, ते म्हणाले की, शरद पवार व पंतप्रधान यांची दिल्लीत भेट झाली. त्यानंतर पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन भेटीचे कारण स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्या भेटीचा पुनरुच्चार मी करावा असे मला वाटत नाही. पंतप्रधानांबरोबरच्या भेटीत मलिक व अनिल देशमुख यांच्याबाबत काही बोलले नसल्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत, त्याबाबत आम्ही पवारसाहेबांशी बोललो. त्यावर त्यांनी सर्व विषयांवर पंतप्रधानांशी चर्चा केली आहे, असे स्पष्टपणे आम्हाला सांगितले. मात्र काही जण जाणीवपूर्वक समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर केली.

अभिनेत्री आसावरी जोशी राष्ट्रवादीत

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर मावळ तालुक्यातील भाजपचे अमोल केदारी, शिवली सरपंच बाळासाहेब आडकर, माजी पंचायत समिती सदस्य दिनकर आडकर, अरुण आडकर, काँग्रेसचे प्रवक्ते फिरोज शेख, रायगड सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष नंदू भोपी, कामगार नेते भारत चौधरी, नितळम उपसरपंच भानुदास म्हात्रे, अशोक भोपी, संदीप भोपी, प्रतीक चौधरी, वृषभ चौधरी, ज्ञानदेव म्हात्रे, भीमसेन पाटील, रंजित तांबडे आदींसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.