Discussion between Chief Ministers of Maharashtra and Karnataka soon visit Mumbai news ysh 95 | Loksatta

X

महाराष्ट्र-कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा

कर्नाटकच्या आक्रमक भूमिकेच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र-कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
कर्नाटकातील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकची मंगळवारी नासधूस केली.

उभयतांची लवकरच भेट ; अमित शहा यांच्याकडे दाद मागणार – फडणवीस 

मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादाला लागलेले हिंसक वळण लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात मंगळवारी रात्री दूरध्वनीवर चर्चा झाली व उभयतांनी भेटण्याचे मान्य केले. कर्नाटकच्या आक्रमक भूमिकेच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. बुधवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, शिंदे गटाचे खासदार सीमा प्रश्नावर आवाज उठविणार आहेत. सीमा भागात राज्यातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनानंतर राज्यात प्रतिक्रिया उमटली. हा वाद अधिक चिघळला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यावर उभय मुख्यमंत्र्यांमध्ये एकमत झाल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.  सकाळी झालेल्या हल्लाप्रकरणी  संबंधितांवर कारवाई करण्याचे  आश्वासन बोम्मई यांनी दिले आहे. लवकरच शिंदे व बोम्मई या मुख्यमंत्र्यांची भेट होणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

कर्नाटक सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ राज्य शासनाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळारी सांगितले. तसेच सीमेवर झालेल्या हिंसाचाराबद्दल फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्नाटकमध्ये बेळगावनजीकच्या हिरेबागवाडी येथे महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना मंगळवारी दूरध्वनी करुन तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन बोम्मई यांनी दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. कोणीही चिथावणीखोर वक्तव्ये करु नयेत आणि एखाद्या घटना किंवा मुद्दय़ावर लगेच प्रतिक्रिया व्यक्त करु नये, ते कोणाच्या हिताचे नाही, असे मतही त्यांनी मांडले.  हिरेबागवाडी पथकर नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी झेंडे फडकवीत महाराष्ट्रातील सहा ट्रकवर दगडफेक केली व शाई फासली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटले असून अनेक राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्याचे आश्वासन बोम्मई यांनी दिले असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकमधील घटना आणि राज्यातील परिस्थिती विषयी चर्चा केली.

छत्रपतींच्या नावाने विरोधकांचे राजकारण

 छत्रपती शिवाजी महाराज हे देशासाठी आदर्श असून कोणाच्याही चुकीच्या वक्तव्यांमुळे त्यांचे महत्त्व कमी होत नाही. महाविकास आघाडीचा राज्यपालांवर राग वेगळय़ा कारणांसाठी असून तो कशासाठी आहे, हे सर्वाना माहीत आहे. त्यामुळे ते राज्यपालांविरोधात १७ तारखेला मोर्चा काढत आहेत. छत्रपतींच्या नावाने विरोधकांचे राजकारण सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.  छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी आदर्श आहेत, हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार सांगितले आहे. राज्यपाल रायगडासह महाराजांच्या अनेक गडकिल्ल्यांवर गेले आहेत, असे फडणवीस यांनी नमूद केले.

कर्नाटककडून कारवाईचे आश्वासन

 या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कर्नाटकमधील घटना चुकीच्या असून तेथील सरकार कोणालाही पाठिंबा देणार नाही किंवा पाठीशी घालणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिले आहे. विकासाच्या वाटेवर जात असताना राज्याराज्यांमध्ये हे प्रकार आणि वातावरण योग्य नाही. देशात संविधानाने कोणालाही कोठेही जाण्याचा, राहण्याचा व व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे. कोणतेही राज्य कोणालाही रोखू शकत नाही. संविधानातील तरतुदींचे राज्य सरकार पालन करीत नसेल, तर आम्हाला केंद्राकडे जावे लागेल. त्यामुळे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून या सर्व बाबी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घालणार आहे. सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना हे प्रकार चुकीचे आहेत. महाराष्ट्रातही कोणीही कायदा हाती घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा पोलीस कारवाई करतील, असा इशारा देत फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात न्यायोचित परंपरांचे आणि कायद्याचे राज्य आहे. कोणत्याही बाबींवर लगेच प्रतिक्रिया व्यक्त करून वातावरण बिघडवू नये. नाही तर या गोष्टी वाढत जातील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ४८ तासांत हे प्रकार थांबले नाहीत, तर कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला असला तरी त्यांच्यावर तशी वेळ येणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार उचित कार्यवाही करेल, असे फडणवीस म्हणाले.

आपणही दगड मारायचा का?

नवी दिल्ली : कर्नाटकने दगडफेक केली म्हणून महाराष्ट्रानेही दगड उचलून भिरकवायचा का, असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला. ही भारत-पाकिस्तानमधील लढाई नव्हे. सीमावादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर तातडीने सुनावणी घेण्यासाठी दोन्ही राज्य सरकारांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. बेळगाव मुद्दय़ावर राज्य सरकारने मवाळ भूमिका घेतलेली नाही. लोकांच्या भावना कशासाठी भडकवायच्या? कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कशासाठी निर्माण करायचा? सीमाभागांमधील लोकांची मने कलुषित कशासाठी करायची, असेही बावनकुळे पुढे म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 00:02 IST
Next Story
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन तेव्हा आणि आता..