scorecardresearch

मुख्यमंत्र्यांशी आज राजकीय स्थितीवर चर्चा

आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाचा समारोप रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादाने होईल.

मुंबई : आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाचा समारोप रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादाने होईल. दुपारी १२.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

राज्याच्या राजकारणाचा चौफेर आढावा घेण्याकरिताच ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ हा वेबसंवाद आयोजित करण्यात आला होता. सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, राज्यासमोरील आव्हाने आदींचा उहापोह या वेबसंवादाच्या माध्यमातून करण्यात आला. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आपापल्या पक्षांची भूमिका मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज या उपक्रमात सहभागी होत आहेत.

मशिदींवरील भोंगे हटविणे आणि हनुमान चालीसाचे पठण, राजकीय आरोप-प्रत्यारोप, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोगाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होणारा आरोप, राज्य सरकारच्या कारभारावर भाजपकडून केली जाणारी टीका, शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, राज्यासमोरील प्रश्न, केंद्र व राज्य संबंध, राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणारे विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प आदी महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री ठाकरे हे भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

आधीच्या वेबसत्रात सहभागी झालेले भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दिलदारपणाचे कौतुक करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर यथेच्छ टीका केली होती. त्याचाही समाचार ठाकरे हे घेण्याची शक्यता आहे.

  • मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
  • सहप्रायोजक  : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Discussion political situation chief minister conclusion democracy vision angle upcoming municipal corporation elections ysh

ताज्या बातम्या