Discussion Positive Uddhav Thackeray claim after meeting Prakash Ambedkar ysh 95 | Loksatta

चर्चा सकारात्मक!; प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांचा दावा

आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-वंचित आघाडी यांच्या युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सोमवारी भेट होऊन चर्चा झाली.

चर्चा सकारात्मक!; प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांचा दावा
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (संग्रहित फोटो)

मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-वंचित आघाडी यांच्या युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सोमवारी भेट होऊन चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून, वंचित महाविकास आघाडीत सहभागी होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी विशेषत: आम्हा दोघांचे वैचारिक व्यासपीठ एक आहे, असे सांगून ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले होते.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी या आधीच शिवसेनेबरोबर युती करण्याची वंचित आघाडीची तयारी असून, त्याबाबत प्रकाश आंबेडकर व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्यात दोन बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर सोमवारी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाल्याने युतीच्या चर्चेला आणखी वेग आल्याचे मानले जाते. ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये या दोन नेत्यांची बैठक झाल्याची माहिती शिवसेनेतील सूत्राकडून देण्यात आली.

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा सकारात्मक झाली आहे. काही विषयांवर अजून चर्चा सुरू आहे. पण लवकरच अंतिम निर्णय होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार का, या प्रश्नावर त्यांची तशी तयारी असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:02 IST
Next Story
विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांची सारवासारव; मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याने वाद