विविध आमिषांच्या जोरावर मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना आपल्याकडे खेचणाऱ्या आणि नंतर त्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या ‘दिशा डायरेक्ट’ या कंपनीचे ‘आयएसओ’ मानांकन रद्द करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना स्वप्नातील ‘सेकंड होम’च्या आशा दाखवायच्या, सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांनी रक्कम भरेपर्यंत चांगली सेवा दिल्याचा आव आणायचा आणि नंतर गुंतवणूकदारांनाच खेटे घालायला लावायचे, या पद्धतीमुळे हैराण झालेले गुंतवणूकदार आता एकत्र आले आहेत. हक्काची कमाई परत मिळावी, यासाठी त्यांनी आता लढा सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृत्तपत्रातील पानभर जाहिराती आणि जोडीला एखादा प्रसिद्ध अभिनेता ब्रँड अँम्बेसिडर नेमून मध्यमवर्गीयांना खेचणाऱ्या दिशा डायरेक्टच्या या फसवणुकीच्या कथांना ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम वाचा फोडली. गुंतवणूकदारांची फसवणूक केली जाणार नाही, असा दावा कंपनीचे सर्वेसर्वा संतोष नाईक यांनी केला, प्रशासकीय अडचणींमुळे प्रकल्प रखडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, परंतु पुढे मात्र काहीही न झाल्याने गुंतवणूकदार हादरले आहेत. गुंतवणूकदारांना भेटही न देणारे नाईक आणि उडवाउडवीची उत्तरे देणारे कर्मचारी यांच्या कचाटय़ात गुंतवणूकदार सापडले आहेत. कंपनी आयएसओ मानांकित असल्याचा टेंभा दिशा डायरेक्ट मिरवते आहे. त्यांच्या संकेतस्थळाला भेट दिली असता, ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिटय़ुशनची अनुदानित कंपनी असलेल्या बीएसआय इंडियाने आएसओ ९००१: २००८ प्रमाणपत्र दिल्याचे दाखविते. परंतु प्रत्यक्षात हे प्रमाणपत्र रद्द आहे. याबाबत बीएसआय इंडियाचे संदीप दुआ यांनी ई-मेलद्वारे दिलेल्या प्रतिसादाद्वारे, दिशा डायरेक्ट कंपनीचे आयएसओ प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे सांगितले.

‘लँडमार्क मिडोज’ या रोह्य़ाजवळील ताम्हिणी घाटातील गुंतवणूकदारांच्या समस्यांना ‘लोकसत्ता’ने १३ फेब्रुवारी २०१३ मध्ये वाचा फोडली तेव्हा, आपण नेहमीच ग्राहकांचे हित नजरेपुढे ठेवले, असा दावा नाईक यांनी केला होता. या प्रकल्पातील फक्त १० ते १५ टक्के कामे अपूर्ण असून आपण लक्ष घालून चार ते पाच महिन्यांत प्रकल्प पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु प्रकल्प अद्याप सरकलेला नाही, असे ताम्हिणी गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. ताम्हिणी तसेच शिरोळ व वाडा येथील अनुक्रमे लँडमार्क हिल्स आणि वॉटरफ्रंट प्रकल्पात गुंतवणूकरादांना भूखंडाचा ताबा तरी मिळाला. परंतु ब्यु माऊंट (नवीन महाबळेश्वर) आणि फार्म व्हिलेज (कोल्हापूर) या प्रकल्पात  संपूर्ण पैसे भरूनही गुंतवणूकदारांना भूखंड पाहता आलेला नाही. पोलादपूरजवळ फार्म व्हिलेज हा प्रकल्प २०० एकरवर राबविण्यात येणार असल्याचे सांगून पुण्याहून अनेक गुंतवणूकदारांना नेण्यात आले होते. भूखंड आरक्षित करणाऱ्यांना सवलतीही देण्यात आल्या. पपई वा डाळिंबाचे उत्पादन घेता येईल. चार वर्षांनंतर दरमहा रक्कम मिळेल. हक्काचे फार्म हाऊस बांधता येईल आदी कितीतरी बाबींचे आश्वासन दिले. परंतु भूखंडाचे वितरण, नगदी फळझाडे, करारनामा, सुरक्षा आदींच्या नावे बोंब आहे.

न्यायालयात दाद मागण्याची तयारी

लँडमार्क मिडोज, ताम्हिणी, रोहा; वॉटरफ्रंट, वाडा; ब्यु माऊंट, नवीन महाबळेश्वर; लँडमार्क हिल्स, शिरोळ; पोलादपूर फार्म व्हिलेज या पाच प्रकल्पांत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन लढा सुरू केला आहे. या साठी त्यांनी dishadirectcustomers@hotmail.com हा मेल आयडी तयार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत दिशा डायरेक्ट कंपनीला आश्वासने पूर्ण करण्यास भाग पाडायचे वा आपले पैसे परत घ्यायचे, अशी या गुंतवणूकदारांची तयारी आहे. प्रसंगी न्यायालयात जाऊन दाद मागण्याची तयारीही या मंडळींनी सुरू केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dish direct iso rating cancel
First published on: 09-11-2016 at 03:09 IST