मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाशी संबंधित सर्वांनाच चौकशीसाठी पाचारण केले जावे, अशी अपेक्षा दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी केली आहे. त्यांची तक्रारच जबाब म्हणून या गुन्ह्यात जोडण्यात आली आहे. परंतु संशयित म्हणून कोणाच्याही नावाचा उल्लखे सीबीआयने केलेला नाही. मात्र सीबीआय जबाबातील सर्वांना चौकशीसाठी बोलावू शकते, असे सीबीआयमधून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
सीबीआयने नियमित प्रकरण (आरसी) म्हणून दाखल केलेल्या गुन्ह्यात फिर्यादीने दिलेल्या सर्वांचे जबाब नोंदविण्याची पद्धत असते. त्यामुळे या फिर्यादीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच मालवणी पोलीस ठाण्याचे तसेच शवविच्छेदन करणारे, न्याय वैद्यक प्रयोगशाळेतील सर्व संबंधित यांना चौकशीसाठी बोलवावे, असेही या जबाबात नोंदविण्यात आले आहे. याशिवाय दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी हजर असणारे सर्व तिचे मित्र, सहकारी तसेच ज्या इमारतीत तिचा मृतदेह आढळला, त्या मालवणीतील जनकल्याण नगरातील रिजेन्ट गॅलेक्सी या इमारतीतील सुरक्षा रक्षक आदी सर्वांची नावे या तक्रारीत आहेत. या सर्वांना सीबीआयने पाचारण करुन सुरुवातीपासून या प्रकरणाचा तपास करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
दिशाचा आणि सुशांत सिंगचा मृत्यू याचा एकमेकांशी संबंध आहे का, याची कसून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यातूनच या प्रकरणाचा गुंता सुटेल, असेही त्यात नमूद आहे. अमली पदार्थ तस्करीशी संबंधित महत्त्वाची माहिती दिशाकडे होती आणि तिने ती सुशांत सिंगला दिली. सुशांतने ती माहिती आपल्या मित्रांना सांगितल्यानंतर या सर्व घटना घडल्या आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचली होती व त्यातून काही कारवाई होण्याच्या आधीच या घटना घडल्याचा दावाही करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तपासात मोठ्या प्रमाणात त्रुटी ठेवल्या. दिशाचा मृत्यू हा आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे या सर्वांची कसून चौकशी केली तरच सत्य बाहेर येईल, असे तक्रारीत म्हटले आहे.
प्रामुख्याने दाखल झालेल्या तक्रारीचा धागा पकडूनच तपास करण्याची सीबीआयची पद्धत असते. ही पद्धत सीबीआयने वापरली तर या प्रत्येकाला चौकशीसाठी पाचारण करावे लागेल. परंतु विनाकारण कुणाला आरोपी समजून चौकशीसाठी बोलावू नये, असे उच्च न्यायालयानेच स्पष्ट केल्यामुळे सीबीआयला काळजीपूर्वक हा तपास करावा लागेल, असे मत सीबीआयमध्ये काम केलेल्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने व्यक्त केले.
