मुंबई: दिशा सालियन आत्महत्याप्रकरणात शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांचा दुरान्वयेही संबंध नाही. हे केवळ राजकीय बुद्धीने रचलेले षड्यंत्र असल्याचा दावा शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला. एफआयआरच्या १६ पानांपैकी एकच पान बाहेर कसे आले, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित करत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंब्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

हे संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असून दोन बड्या सत्ताधारी नेत्यांच्या सांगण्यावरून आणि दबावाखाली सीबीआयकडून प्रथम दर्शनी अहवाल (एफआयआर) तयार करण्यात आला आहे. आमच्या वाट्याला सातत्याने राजकीय बदनामीच आली आहे आणि आताचा प्रकारही त्याचाच एक भाग आहे. जर एफआयआर १६ पानांचा आहे तर मग त्यातले एकच पान ठरवून बाहेर कसे येते, असा सवाल राऊत यांनी केला. दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा दुरान्वये देखील संबंध नसताना, यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसताना केवळ ठाकरे कुटुंबाला डाग लावण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंब्यासाठी दबाव

केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याकरता सातत्याने दबाव निर्माण केला जात आहे. महाराष्ट्रात अन्यायाविरोधात लढाई सुरू आहे. सातत्याने आदित्य ठाकरे हे केंद्रस्थानी आहेत. महापालिकांतील विविध प्रकरणे ते बाहेर काढत असल्याने त्यांना थांबवण्याचा हा प्रयत्न आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

आदित्य ठाकरे यांचे निर्दोषत्व सिद्ध होईल – रोहित पवार

दिशा सालियन प्रकरणात राजकीय हेतूने आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात आहे, यापूर्वीही सुशांतसिंह राजपूत प्रकरणात असेच घडले होते. यापूर्वी त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणातही त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होईल. सीबीआयवर विश्वास नसला तरी आगामी काळात त्यांना क्लीन चिट देईल. पुढील तीन वर्षांत कोणत्याही निवडणुका नसताना आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात असेल तर लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका मुदतपूर्व घेण्याचा सरकारचा निर्णय विचार आहे का, अशी शंका राष्ट्रवादी (शदर पवार) आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.