मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसतानाही निव्वळ राजकीय हेतूने आपले नाव या प्रकरणात गोवले जात आहे, असा युक्तिवाद शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्यावतीने शुक्रवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने दिशाच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला.

दिशा हिने आत्महत्या केली नव्हती, तर लैगिक अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आली होती, असा दावा करून तिच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करावा, तसेच. प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर सलग तीन दिवस प्रदीर्घ सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. तत्पूर्वी, याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल करणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या वतीने वरिष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद करताना उपरोक्त दावा केला. याप्रकणी आपल्याविरोधात कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच, कोणाच्या तरी सांगण्यावरून कारवाई करणे योग्य ठरणार नाही. प्रकरणाशी संबंधित नसलेल्या राशिद खान पठाण नामक व्यक्तीने या प्रकरणी तक्रार केली. त्यावेळी, सतीश सालियन यांच्यावतीने कुठलीही तक्रार देण्यात आली नाही, केवळ ऐकीव माहितीच्या आधारे आपल्याविरोधात आरोप करणे यामागे केवळ राजकीय हेतू आहे, असा युक्तिवाद देखील ठाकरे यांच्यावतीने करण्यात आला.

भाजप खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी राजकीय हेतूने प्रेरित आपल्याविरोधात आरोप केल्याचेही आदित्य यांच्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. आदित्य यांना याचिकाकर्त्यांप्रती पूर्ण सहानभूती आहे. त्यांच्या शंकेचं निरासन होऊन त्यांना मुलीच्या मृत्यूबाबत पडलेल्या प्रश्नांची उत्तर मिळालीच पाहिजेत. परंतु, दिशाच्या मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण सुरू थांबायला हवे, असेही यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला गेला.

न्यायालयाकडून मृतदेहाच्या स्थितीबाबत प्रश्न

दिशाच्या शरीरावर कपडे नव्हते असा रुग्णालयातील पंचनाम्यात उल्लेख आहे ? मग ते कपडे कोणी काढले ? संबंधित डॉक्टरांचा जबाब का नोंदवला नाही ? असे प्रश्न न्यायालयाने सुनावणीच्या वेळी उपस्थित केले. मात्र, यात काहीही तथ्य नसून दिशाचे आत्महत्येनंतरचे रुग्णालयातील छायाचित्र न्यायालयात दाखवण्यात आले, त्यात तिच्या शरीरावर कपडे असल्याचे दिसत होते. परंतु, इतक्या उंचावरून पडूनही फक्त तोंडातूनच रक्त कसे आले ? तोंडावर आणि शरीरावर इतर कुठल्याही मोठ्या जखमा का नाहीत ? अशी विचारणाही न्यायालयाने केली. त्याला उत्तर देताना, दिशा उंचावरून तोंडावर पडली होती, त्यामुळे, तिच्या डोक्याला आणि जबड्यालाही जबर मार लागला होता. तसेच, तिच्या शरीरावर अन्यही जखमाही होत्या, असे सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयाला सांगितले.