मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्युसंदर्भातील पुरावे नव्याने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नसल्याचे राज्य सरकारतर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन दिशा हिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोणताही आदेश देण्यापूर्वी प्रकरणाशी संबंधित सर्व आवश्यक वैद्यकीय अहवाल पाहावे लागतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दिशा हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच, दिशाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्यातील काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपण्यात येत असल्याचा आरोपही सालियन यांनी याचिकेत आहे.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी, प्रकरणाशी संबंधित पुरावे नव्याने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची आणि त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याची माहिती सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी न्यायालयाला दिली. तसेच, याचिकेवर सुनावणी तहकूब करण्याची मागणी केली.
त्याची दखल घेऊन या प्रकरणी प्राथमिक मत तयार करण्यासाठीही आम्हाला वैद्यकीय अहवाल पाहणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यावर, आम्ही फक्त गुन्हा नोंदवण्याची मागणी करत आहोत आणि या टप्प्यावर शवविच्छेदन अहवाल आवश्यक नसल्याचा युक्तिवाद सालियन हिच्या वडिलांची बाजू मांडणारे वकील निलेश ओझा यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखलाही त्यांनी दिला. तथापि, न्यायालयाने मात्र येथे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, न्यायालय म्हणून आम्हाला हा अहवाल पाहायचा आहे. त्याचप्रमाणे, याचिकाकर्त्यांच्या मागणीचा विचार करण्यासाठी शवविच्छेदन अहवाल आवश्यक आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, याचिकाकर्त्याला सुधारित याचिका करण्याची परवानगी दिली. तसेच, एका आठवड्यात दिशा हिचा शवविच्छेदन अहवाल य़ाचिकेसह जोडण्याचे आदेश दिले.
