दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने FIR दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आहे, त्याच प्रमाणे सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती यांचीही नावं आहेत. या प्रकरणात आम्हाला न्याय नक्की मिळेल असं दिशाचे वडील सतीश सालियन यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर दिशा सालियन आणि सुशांत यांच्या मृत्यूचं कनेक्शन आहे असाही दावा सतीश सालियन यांनी केला आहे.

दिशाचे वडील सतीश सालियन काय म्हणाले?

आमच्याकडे जे काही पुरावे होते ते सगळे आम्ही सीबीआयला दिले आहेत. तसंच आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहोत. त्यांना आणखी काही मदत लागली तर आम्ही ती देखील करू असं सतीश सालियन यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्याकडे सबळ पुरावे आहेत म्हणूनच आम्ही हिंमतीने हा लढा देत आहोत. त्यांना विचारण्यात आलं की यात कुठली मोठी नावं आहेत? त्यावर सतीश सालियन म्हणाले, “आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली यांची प्रामुख्याने नावं आहेत. तसंच हा गुन्हा लपवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यात सचिन वाझे, परमवीर सिंग, रिया चक्रवर्ती ही नावं आहेत. आत्तापर्यंत जाणीवपूर्व हे प्रकरण दाबलं गेलं. सहा वर्षे केस चालण्याची गरजच नव्हती.” असं सतीश सालियन म्हणाले.

दिशा आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणांत कनेक्शन आहेच-सतीश सालियन

दिशा आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात काही कनेक्शन आहे असं वाटतं का? हे विचारलं असता सतीश सालियन म्हणाले, होय जरूर कनेक्शन आहे. दिशाही सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती. दिशाला मारलं गेलं तेव्हा सुशांत पत्रकार परिषद घेणार होता. तो त्यात हे सांगणार होता की आता मलाही मारलं जाईल. माझ्या मुलीला आता तरी न्याय मिळेल असं मला वाटतं आहे. कारण हे सरकार आम्हाला न्याय देईल ही आम्हाला १०० टक्के खात्री आहे असंही सतीश सालियन म्हणाले. IANS या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत सतीश सालियन यांनी हे विधान केलं आहे.

८ जून २०२० ला दिशा सालियनचा मृत्यू

८ जून २०२० ला दिशा सालियनचा मालाड येथील राहत्या घरातून पडून मृत्यू झाला होता. दिशाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह तिने काही काळ काम केलं होतं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सविस्तर तपास करत दिशाने आत्महत्या केल्याचा दावा केला होता. मार्च २०२५ मध्ये देशाचे वडील सतीश सालियन यांनी दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दिशाचे वडील भावूक झाले होते. आता या प्रकरणात FIR दाखल झाली असून त्यात आदित्य ठाकरेंचं नाव आहे.