मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूशी संबंधित अंतिम अहवाल अद्याप सादर न केल्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, नवे पुरावे सादर करण्यात आल्याची आणि ते तपासायचे असल्याची सबब पुढे करून अंतिम अहवाल सादर करणार नाही का ? असा प्रश्न न्यायालयाने केला व तपास यंत्रणेने त्याबाबत २४ तासांत अहवाल सादर करायला हवा, असे खडेबोल सरकारला सुनावले.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका करून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे त्यावर सुनावणी झाली. त्यावेळी, प्राथमिक चौकशीचा अहवाल तयार असला तरीही चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. याशिवाय याचिकाकर्त्यांनी मागील सुनावणीच्या वेळी पेन ड्राईव्हच्या माध्यमातून नवे पुरावे सादर केले असून तपास यंत्रणा त्याची पडताळणी करत आहे.
याच कारणास्तव या प्रकरणी तपासाचा अंतिम अहवाल सादर केला गेला नाही, असे सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, खंडपीठाने सरकारच्या या दाव्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, एका पेन ड्राईव्हमधील पुरावे तपासण्याकरता असा किती वेळ लागतो ? दोन तास ? असा प्रश्न करून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १७४ नुसार, नव्या पुराव्यांवर आधारीत चौकशी अहवाल हा २४ तासांत दाखल व्हायला हवा याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. तसेच, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात उपस्थित राहून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दरम्यान, दिशाचा मृत्यूमागे कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न असल्याचे आढलेले नाही, त्यामुळेच दिशाच्या मृत्यूची अपघाती नोंद करण्यात आली असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नाही, असा दावा मालवणी पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. तसेच, सालियन यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे.
