मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत तिच्या वडिलांनी संशय व्यक्त केला होता. असे असतानाही पोलिसांनी या प्रकरणाचा तपास का केला नाही ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी उपस्थित केला.

दिशा हिच्या शवविच्छेदन अहवालानुसार, १४व्या मजल्यांवरून पडूनही तिच्या शरीरावर कोणतीही दुखापत का आढळली नाही ? असा प्रश्नही न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. मालाड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून दिशा हिचा ८ जून २०२० रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली होती. पोलिसांनी चौकशीनंतर तिचा मृत्यू आत्महत्या असल्याचे म्हटले होते. मात्र तिचे वडील सतीश सालियन यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप केला होता.

त्यांच्या या याचिकेवर न्यायमूर्ती डांगरे आणि न्यायमूर्ती देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी, या प्रकरणाकडे केवळ अपघाती मृत्यूची चौकशी म्हणून पाहण्याऐवजी गुन्हा का नोंदवला गेला नाही? दिशाच्या वडिलांनी तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता, तर पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्यापासून कोणी रोखले होते ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

त्यावर, या प्रकरणाकडे अपघाती मृत्यू म्हणून पाहिले गेले आणि प्रकरणाची दोनवेळा चौकशी करण्यात आली. दोन्ही वेळा ही आत्महत्या असल्याचेच निष्पन्न झाले, असे सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयाला सांगितले. प्रकरणातील साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांतूनही या निष्कर्षाला दुजोरा मिळाल्याचे हिरे यांनी न्यायालयाला सांगितले. तथापि, शवविच्छेदन अहवालानुसार, इतक्या उंचावरून पडूनही दिशाच्या शरीरावर कोणतीही दुखापत का झाली नाही याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. तसेच, एखादी व्यक्ती १४ मजल्यांच्या उंचीवरून पडली, तर शरीरावर काहीही दुखापत होणार नाही का ? असा प्रश्नही न्यायालयाने विचारला.

तेव्हा छायाचित्रांनुसार दिशाच्या डोक्याला दुखापत झाल्याचे दिसून आले, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर, पोलिसांनी सुरुवातीला दाखवलेल्या छायाचित्रांमध्ये अशी कोणतीही दुखापत दिसून आल्या नाही, असा आरोप सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी केला. पोलिसांनी नंतर डोक्याला दुखापत झाल्याचे दर्शवणारी ही छायाचित्रे बनावटरीत्या तयार केली, असा दावाही त्यांनी केला. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याला प्रकरणाशी संबंधित अपघाती मृत्यूची नोंद असलेल्या अहवालासह काही कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याबद्दलही पोलिसांना फटकारले. या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्यामुळे कोणताही तपास देखील सुरू नाही. केवळ अपघाती मृत्यूची चौकशी केली जात आहे आणि पोलिसांचा निष्कर्ष ‘आत्महत्या’ असा आहे. अशावेळी याचिकाकर्त्याला काही सामान्य स्वरूपाची कागदपत्रे देण्यापासून तुम्हाला कोण रोखत आहे ? असा प्रश्न न्यायालयाने पोलिसांना केला. तसेच, प्रकरणाची पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी निश्चित केली.

दिशाच्या वडिलांची मागणी काय ?

सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची आणि शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. सालियन यांच्या याचिकेनुसार, जून २०२० मध्ये दिशा संशयास्पद परिस्थितीत मृत अवस्थेत आढळली होती. तिच्यावर बलात्कार करून खून करण्यात आला होता आणि त्यानंतर काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हेतूने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही सालियान यांनी याचिकेत केला आहे.