अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. दिशा हिने आत्महत्या केली नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप करून तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आता या निर्णयानंतर बोलताना दिशाचे वडील म्हणजेच सतीश सालियन यांचा कंठ दाटून आला.
न्यायालयाच्या निर्णयानंतर दिशा सालियनच्या वडिलांचा कंठ दाटून आला होता
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी कोर्टाचे आभार मानले. हायकोर्टाच्या निकालानंतर ते बाहेर भावूक झाले होते. न्यायालयाबाहेर माध्यमांसमोर उभे असताना त्यांच्या डोळ्यांत मुलीला गमावल्याचं ओझं स्पष्ट दिसत होतं. ते निःशब्द झाले होते
८ जून २०२० ला दिशा सालियनचा मृत्यू
८ जून २०२० ला दिशा सालियनचा मालाड येथील राहत्या घरातून पडून मृत्यू झाला होता. दिशाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह तिने काही काळ काम केलं होतं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सविस्तर तपास करत दिशाने आत्महत्या केल्याचा दावा केला होता. मार्च २०२५ मध्ये देशाचे वडील सतीश सालियन यांनी दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दिशाचे वडील भावूक झाले होते.
सतीश सालियन यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
मी मागच्या सहा वर्षांपासून या निकालाची वाट बघत होतो असं सतीश सालियन यांनी साश्रू नयनांनी सांगितलं. मी माझ्या मुलीला गमावून बसलो आहे आता माझ्याकडे फार काही बोलण्यासाठी शब्द नाहीत असंही सतीश सालियन यांनी म्हटलं आहे. निर्णय दिल्यानंतर मी न्यायाधीशांसमोर हात जोडले. आज मला बरं वाटतं आहे या पलिकडे मी फार काही बोलू शकणार नाही असंही सतीश सालियन यांनी म्हटलं आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
दिशाच्या वडिलांचा आरोप काय ?
तपासातील त्रुटींवर बोट ठेवताना त्यात गुंतलेल्या राजकीय व्यक्तींमुळे पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप सालियन यांच्यातर्फे करण्यात आला होता. या याचिकेवरील सुनावणी टाळण्यासाठीही प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला होता. घटना घडली त्या दिवसापासूनच पोलिसांनी हे प्रकरण कमकुवत होईल याचाच प्रयत्न केल्याचा दावा देखील त्यांनी केला. पोलिसांनी दिशाच्या अपघाती मृत्यूची नोंद ही तिच्या घरच्यांचे म्हणणे नोंदवण्यापूर्वीच का केली ? दिशाचे शवविच्छेदन ५० तासांनंतर का झाले ? करोना हे त्याचे कारण असेल, तर त्यानंतर काही दिवसांनी मृतावस्थेत सापडलेल्या सुशांतसिंह राजपूत याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अवघ्या सात तासांत कसे झाले ? पोलीस उपायुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्याच दिवशी या घटनेला आत्महत्या कसे काय घोषित केले ? असे अनेक प्रश्न सतीश सालियन यांच्यातर्फे युक्तीवाद करताना उपस्थित करण्यात आले.
