खासगी रुग्णालयांकडील साठा पडून; मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई : मुदत संपलेल्या करोना प्रतिबंधात्मक लशींची विल्हेवाट कशी लावावी याबाबत संबंधित उत्पादक कंपन्या किंवा केंद्र सरकारद्वारे कोणतीही ठोस मार्गदर्शक तत्त्वे अद्याप न दिल्यामुळे या लशीचे काय करावे, असा प्रश्न खासगी रुग्णालयांपुढे निर्माण झाला आहे.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली

नफ्याच्या उद्देशाने लशींची केलेली साठेबाजी आणि खासगी रुग्णालयातील लसीकरणाला कमी झालेला प्रतिसाद यामुळे मुंबईसह राज्यभरात सुमारे ८० हजार लशींचा साठा मुदतबाह्य होणार आहे. यातील काहींची मुदत गेल्या आठवडय़ात संपली आहे. मुदतबाह्य झालेल्या लशींचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच हे वैद्यकीय उत्पादन असल्यामुळे याचे अन्य दुष्परिणाम होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे; परंतु यासंबंधीच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना केंद्र किंवा संबंधित उत्पादक कंपन्यांनी दिलेल्या नाहीत. ‘आमच्या रुग्णालयात सुमारे १२ हजार मात्रा मुदतबाह्य झाल्या त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मागणी सिरम इन्स्टिटय़ूटकडे केली आहे; परंतु त्यांच्याकडून अजून काहीही उत्तर आलेले नाही. आम्ही या लशी सध्या शीतगृहात ठेवल्या असून सूचनांची वाट पाहत आहोत,’ असे कोकिळाबेन रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष शेट्टी यांनी सांगितले. 

‘रुग्णालयातील सुमारे ३० हजार मात्रा मुदतबाह्य झाल्या असून दोन दिवसांनी यासंबंधीचे पत्र सिरम इन्स्टिटय़ूटला लिहणार आहे; परंतु अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झालेली नाहीत,’ असे चेंबूरच्या सुराना रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रिन्स सुराना यांनी सांगितले. ‘अ‍ॅपेक्स रुग्णालयात सुमारे दहा हजार मात्रा मुदतबाह्य झाल्या असून आम्ही याची विल्हेवाट कशी लावायची याच्या सूचना देण्याची मागणी पालिकेकडे केली आहे,’ असे अपेक्स रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. व्रजेश शाह यांनी सांगितले.

मुदतबाह्य झालेल्या लशींची विल्हेवाट लावण्याबाबतची मागणी अनेक खासगी रुग्णालयांनी केली आहे; परंतु आम्हालाच याबाबत ठोस माहिती दिलेली नाही. त्यामुळे याबाबत मार्गदर्शक तत्त्वे देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असून याचे प्रत्युत्तर आल्यावर त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मोहिमेतून खासगी रुग्णालये बाहेर?

खासगी रुग्णालयातील लसीकरणाला प्रतिसाद कमी मिळत असल्यामुळे या रुग्णालयांना नफा मिळत नाही. तसेच मुदतबाह्य झालेल्या लशीही बदलून न मिळाल्याने अखेर काही खासगी रुग्णालयांनी लसीकरण मोहीमेतून बाहेर पडण्याचे ठरविले आहे. कोविशिल्ड लशींचा साठा असूनही आता लसीकरणासाठी फारसे कोणी येत नाही. त्यामुळे पुन्हा लस खरेदी करण्याचा काहीच उपयोग नाही. त्यात सुमारे ३० हजारांहून अधिक मात्रा मुदतबाह्य झाल्यामुळे वाया गेल्या आहेत. यातून नफा मिळण्याऐवजी तोटाच जास्त झाला आहे, त्यामुळे लसीकरण मोहिमेत सहभागी होणार नाही, असे अ‍ॅपेक्स रुग्णालयाचे डॉ. शाह यांनी स्पष्ट केले.