मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार बुधवारी रात्री कोळल्यानंतर गुरुवारी दिवसभर मंत्रालयात आवरा- आवर सुरू होती. प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालय आणि निवासस्थानी एकच धावपळ उडाली होती.अडचणींच्या फायलींची विल्हेवाट लावण्यासोबतच आर्थिक हिताच्या फायली हातावेगळय़ा करण्याचा सपाटा लावल्याचे चित्र अनेक मंत्र्यांच्या निवासस्थानी दिसत होते.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ३९ मंत्र्यांनी बंड केल्यापासून राज्यात गेले आठ दिवस अस्थिरता निर्माण झाली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे सर्वच मंत्र्यांच्या दालनात आवरा- आवर सुरू होती. सरकार जाणार यांची पूर्वकल्पना असल्याने उपमुख्यमंत्री तसेच अन्य काही मंत्र्यांच्या कार्यालयात आधीपासूनच आवरा- आवार सुरू झाली होती. तर बंडखोर मंत्र्यांचा कार्यभार काढून घेण्यात आल्यानंतर महत्त्वाच्या भविष्यात अडचणीच्या ठरणाऱ्या फायलींची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू होते.

आज बहुतांश सर्वच मंत्र्यांच्या कार्यालयात कागदपत्रांची विल्हेवाट लावण्याचे तसेच महत्त्वाच्या फायली नष्ट करण्याचे काम सुरू होते. बिनकामाच्या फायली फाड़ून रद्दीत टाकल्या जात होत्या. एरवी फायली आणि भेटीगाठीत गुंग असणारे मंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी आज कागदपत्रांचा विल्हेवाट लावण्यात मग्न होते. त्याचवेळी मंत्र्यांच्या निवासस्थानी महत्त्वाच्या फायली पूर्वलक्ष्यी प्रभावाने मार्गी लावण्याचे काम जोमात सुरू होते.