धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईतल्या जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या भागात धनगर बांधवांनी मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात वाद झाला. यशवंत सेनेचे अध्यक्ष पांडुरंग गडदे यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. आमचं सरकार आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन भाजपनं दिलं होतं. मात्र हे आश्वासन भाजपनं पाळलं नाही म्हणूनच त्यांचा निषेध करत मोर्चा काढला आहे अशी माहिती गडदे यांनी दिली.

निवडणुकांपूर्वी भाजपनं जो जाहीरनामा जनतेसाठी आणला होता त्यातही धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते अजूनही पूर्ण न झाल्यानं अखेर धनगर समाजानं मंगळवारी मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान धनगर समाजाचे आंदोलक आणि पोलीस यांच्यात वाद झाला. मोर्चाच्या सुरूवातीलाही पोलिसानी परवानगी न दिल्यानं आंदोलक आणि मोर्चेकरी यांच्यात वाद झाला होता. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न येऊ नये म्हणून अखेर पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यास परवानगी दिली.

या मोर्चाचा इशारा २५ जुलै रोजीच देण्यात आला होता. धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे, मात्र हा प्रश्न सुटलेला नाही. तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपनं धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर सत्तेवर आल्यावरही भाजपनं हे आश्वासन पाळलं नाही. भाजपनं आश्वासन न पाळल्यानं धनगर समजाची अधोगती सुरू झाली आहे असा आरोपही गडदे यांनी केला आहे. आज झालेल्या मोर्चामध्ये धनगर समाजातल्या महिलांनी आणि पुरूषांनी सहभाग नोंदवला होता.