छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यात रंगला खुर्चीचा वाद?

कोणत्या खुर्चीत बसायचं यावरुन वाद झाल्याची चर्चा

संग्रहित छायाचित्र

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप झाल्यापासून मंत्रिमंडळातील धूसफूस रोज कानावर येतेच आहे. असाच एक वाद आजही समोर आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अन्न  नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ या दोघांमध्ये खुर्चीवर बसण्यावरुन वाद झाल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे सरकारच्या  मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना हा वाद झाला अशी चर्चा आहे. या बैठकीला विजय वडेट्टीवार हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे तेदेखील नाराज असल्याची चर्चा आहे. अशात कोणत्या खुर्चीमध्ये बसायचं? यावरुन अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ या दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळ बैठकीकडे विजय वडेट्टीवार यांनी पाठ फिरवली आहे.चांगलं खातं मिळालं नाही अशी त्याची तक्रार आहे. त्यामुळे ते नाराज झाले आहेत. आता त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरु आहे असं समजतं आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची बैठक गेल्या तासाभरापासून सुरु आहे. एकीकडे वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यात कोणत्या खुर्चीत बसायचं यावरुन वादावादी झाली आहे असे समजते आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सुमारे महिनाभर लांबला होता. त्यानंतर खातेवाटपाची प्रक्रियाही सुमारे आठ दिवस लागले. खातेवाटपानंतर नाराजी आणि धूसफूस सुरुच आहे. सुरुवातीला संजय राऊत नाराज असल्याची चर्चा रंगली. सुनील राऊत यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती मात्र आपण नाराज नाही हे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यानंतर अब्दुल सत्तार यांच्याही राजीनाम्याची चर्चा रंगली होती. अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला वादही महाराष्ट्राने पाहिला. हा वाद एवढा वाढला होता की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मध्यस्थी करुन तो मिटवावा लागला. आता हळूहळू सगळे वाद शांत झाले असे वाटत असतानाच वडेट्टीवार नाराज असल्याची बातमी आली. त्यानंतर छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यात खुर्चीवरुन वाद रंगल्याचीही माहिती समोर आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dispute between ashok chavan and chaggan bhujbal in cabinet meeting scj