मुंबई: भायखळय़ातील राणी बागेत शुक्रवारी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत गदारोळ झाला. वरळीतील आग दुर्घटनेतील लहान बाळाचा नायर रुग्णालयात मृत्यू झाल्याप्रकरणी चर्चा सुरू असताना शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि त्यानंतर दोन्ही पक्षाचे नगरसेवक हमरीतुमरीवर आले.

वरळी बीडीडी चाळीत मंगळवारी पहाटे झालेल्या सििलडर स्फोटातील जखमी बालकाचा मृत्यू झाल्याच्या मुद्दय़ावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. भाजपच्या सदस्यांनी आरोग्य समितीचा राजीनामा दिला तसेच नायर रुग्णालयातही जाऊन भेट दिली. शुक्रवारी स्थायी समितीतही या विषयावर वादळी चर्चा झाली. मात्र त्यानंतर संध्याकाळी झालेल्या महासभेत पुन्हा हाच मुद्दा गाजला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या विषयावर बोलताना भाजपवरच टीका केली.

भाजपच्या सदस्यांनी दिलेले समिती सदस्य पदाचे राजीनामे म्हणजे पळ काढण्याचा प्रकार असल्याचा आरोप जाधव यांनी केला. त्यामुळे चिडलेल्या भाजप नगरसेवकांनी जाधव यांना घेराव घातला. या वेळी सेना भाजपचे नगरसेवक भिडले.

या गोंधळामुळे कामकाज काही काळासाठी बंद ठेवावे लागले. करोनाच्या निर्बंधांमुळे सध्या पालिकेची महासभा राणी बागेतील अण्णा भाऊ साठे सभागृहात भरते आहे. या ठिकाणी भरलेल्या दुसऱ्याच सभेत गदारोळ झाला. काही काळानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर भाजपचे गटनेते प्रभाकर िशदे यांनी या प्रकरणात दोषी व्यक्तींना पुन्हा पालिकेच्या सेवेत घेऊ नका अशी भूमिका मांडली.