मुंबई : पक्षादेश बजावूनही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल शिवसेनेने केलेल्या अर्जानुसार विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील १६ आमदारांना अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस बजाविली आहे. या सर्वाना सोमवारी सायंकाळपर्यंत उत्तर देण्यास मुदत देण्यात आली आहे. या नोटिशीमुळे शिवसेना व शिंदे गटात आता कायदेशीर लढाईला प्रारंभ झाला.

शिंदे यांनी बंड पुकारल्यावर शिवसेना विधमंडळ पक्षांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षादेश लागू केला होता. या बैठकीला उपस्थित नसलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात शिवसेनेने पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार अपात्र ठरवावे म्हणून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर विधानसभा उपाध्यक्षांनी नोटिसा बजाविल्या आहेत.

विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्या स्वाक्षरीने नोटीस या १६ आमदारांना बजाविली आहे. आपल्याला अपात्र ठरविण्याकरिता शिवसेना प्रतोदाने अर्ज केला आहे. यानुसार हे समन्स बजाविण्यात येत असल्याचा उल्लेख त्यात आहे. आपले बचावात्मक लेखी म्हणणे कागदपत्रांसह सोमवारी सायंकाळी ५.३० पर्यंत विधानसभा उपाध्यक्षांकडे सादर करावीत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. उपरोक्त मुदतीत कागदपत्रे सादर केली नाहीत तर आपल्याला काहीही म्हणायचे नाही असे गृहीत धरून अर्जावर निर्णय घेतला जाईल, असेही शेवटी स्पष्ट करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या अर्जावर विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीस बजाविल्याने शिंदे गटाला भूमिका घ्यावी लागेल. शिंदे गटाने आम्ही शिवसेनेत असून, आमचाच गट हा खरा शिवसेना पक्ष असल्याचा पवित्रा घेतला आहे.

नोटीस बजाविण्यात आलेले आमदार : एकनाथ शिंदे, भरत गोगावले, संदीपन भूमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, यामिनी जाधव, अनिल बाबर, बालाजी किणीकर, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, लता सोनावणे, चिमणराव पाटील, रमेश बोरनारे, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर