मुंबई : शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात आता खऱ्या अर्थाने कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. शिंदे यांच्या १२ समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे गुरुवारी रात्री करण्यात आली.

पक्षाने  बुधवारी बोलावलेल्या बैठकीस गैरहजर राहून शिस्तभंग केल्याबद्दल एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, भरत गोगावले यांच्यासह एकूण १२ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करत त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करणारे पत्र शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले आहे. आता त्यावर झिरवळ काय निर्णय घेतात आणि एकनाथ शिंदे गटाकडून काय उत्तर मिळते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बंडाचा झेंडा उभारल्यानंतर मागील ४८ तास शिवसेनेकडून त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना मुंबईत परत येण्याचे आवाहन केले जात होते. गुरुवारी रात्री मात्र शिवसेनेने कारवाईचे अस्त्र उगारले. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनवणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदीपान भुमरे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार या १२ आमदारांचे सदस्य रद्द करण्याची मागणी शिवसेनेने नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे.

शिवसेना पक्षाच्या बैठकीबाबत मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पत्र पाठवून त्या बैठकीस हजर राहण्याबाबत आदेश दिला होता. त्यानंतरही बैठकीसाठी बोलावलेले शिवसेनेचे १२ आमदार त्या बैठकीस हजर राहिले नाहीत. त्यानंतर नियमाप्रमाणे त्यांना नोटीस पाठवून खुलासा विचारण्यात आला. पण त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पक्षाच्या आदेशाचा व शिस्तीचा भंग केल्याबद्दल अपात्रतेची कारवाई करून या १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे, असे पत्र शिवसेना गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना दिल्याचे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अरिवद सावंत यांनी माध्यमांना सांगितले.

कायदा आम्हालाही कळतो- एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका विधानसभा उपाध्यक्षांकडे दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यास प्रत्युत्तर दिले आहे. कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहात. तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो. घटनेच्या १० व्या परिशिष्टाप्रमाणे पक्षादेश हा विधानसभा कामकाजासाठी लागू होतो. बैठकीसाठी नाही. कायदा आम्ही जाणतो त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले.