दोन खांबांतील अंतर ६० मीटरच ; सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत अंतर पुरेसे असल्याचा निर्वाळा

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे.

मुंबई : सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या दोन खांबांमध्ये ६० मीटर म्हणजेच २०० फूट इतके अंतर पुरेसे असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेने दिला आहे. मच्छीमारांच्या बोटी सुरक्षित पद्धतीने बाहेर काढता याव्यात याकरिता दोन खांबांमधील अंतर १८० किंवा २०० मीटर असावे अशी मागणी कोळी बांधवांकडून करण्यात आली होती. मात्र समुद्री विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालामुळे ही मागणी आता फेटाळण्यात आली आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या मार्गातर्गत ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २,१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. त्याकरिता वरळीच्या समुद्रात खांब उभारावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन खांबांमधील अंतराचा मुद्दा चिघळला आहे. पालिकेच्या आराखडय़ानुसार दोन खांबांमध्ये ६० मीटर अंतर ठेवण्यात येणार आहे.

वरळी येथील ‘क्लिव्हलँड जेट्टी’मधून मच्छीमारांच्या बोटींची ये-जा सुरू असते. त्याच्या समोरील दोन खांबांमधील अंतर तरी २०० मीटर ठेवावे अशी मागणी वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेची नियुक्ती केली होती. 

संस्थेने याबाबतचा अहवाल सागरी किनारा रस्ता प्रकल्प कार्यालयास सादर केला आहे. प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या दोन खांबांमधील अंतर हे ६० मीटर म्हणजेच तब्बल २०० फूट एवढे पुरेसे असल्याचा निर्वाळा संशोधन संस्थेने दिला आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर यांनी दिली.

बोटींना २० वर्षांसाठी विमा कवच

या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या खांबांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कवच अर्थात ‘फेंडर’ बसविण्यात येणार आहे. त्यामुळे जलवाहतूक मार्गिकेमधून ये-जा करणाऱ्या बोटींना नुकसान होणार नाही. तसेच खांबावर बोट आदळून अपघात झाल्यास त्यादृष्टीने विमा कवचदेखील घेण्यात येत आहे. हे विमा कवच पुढील २० वर्षांसाठी असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी जल वाहतूक मार्गिकांवर थेट नियंत्रण कक्षाशी जोडलेले अत्याधुनिक सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Distance of 60 meters sufficient between the two pillars for coastal road project zws

Next Story
प्रसिद्ध ‘के. रुस्तुम आईस्क्रीम’ दुकान बंद होणार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी