महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना भगवान गडाच्या पायथ्याला सभा घेण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. भगवान गडाच्या पायथ्याशी गेट क्रमांक २२ जवळ सभा घेण्यास प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची मंगळवारी (दि. ११) भगवान गडाच्या पायथ्यावर सभा घेण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी प्रशासनाने पंकजा मुंडे यांना भगवान गडावर सभा घेण्यास परवानगी नाकारली होती.
प्रशासनाने पंकजा मुंडे यांना गडाच्या मालकीच्या जागेशिवाय अन्यत्र सभा घेण्यास सांगितले. त्यामुळे ही सभा गडाच्या पायथ्याला गेट क्रमांक २२ जवळ होणार आहे. प्रारंभी जिल्हा प्रशासनाने सभेला परवानगी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे कुठे मेळावा घेण्यार याबाबत औत्सुक्य निर्माण झाले होते.
मुंडे समर्थकांनी बीड तहसीलसमोर मोठी गर्दी केली आहे. समर्थकांनी भगवान गडावरच सभेची परवानगी देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ही परंपरा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु समर्थकांच्या दबावामुळे पेचात पडलेल्या प्रशासनाने वरिष्ठांशी बोलण्यासाठी वेळ मागितल्याचे समजते.
दरम्यान, भगवानगडावरुन राजकीय भाषण करु देणार नाही अशी भूमिका महंत नामदेव शास्त्री यांनी घेतल्याने पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात अडथळे निर्माण झाले होते. मात्र दसऱ्याला भगवानगडावर जाणारच अशी ठाम भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतल्याने वाद चिघळला होता. दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील ४० गुंठे जागा मागितली होती. मात्र दस-याच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने पंकजा मुंडे यांना जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुंडे कुटुंबीयांची भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडीत पडण्याची चिन्हे होती.
दरम्यान, शिवाजी पार्कपेक्षा उद्या आमचे लक्ष्य फक्त भगवानगडावरच असेल असे सांगत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. आम्ही पंकजा मुंडे यांच्या पाठिशी असून त्या भगवानगडावरुन काय भूमिका मांडतात याकडे आमचे लक्ष आहे असेही ते म्हणाले. तर महादेव जानकर यांनी देखील पंकजा मुंडे या भगवानगडावर जाणारच आमचा त्यांना पाठिंबा आहे असे सांगितले होते. त्यामुळे भगवानगडावरील दसरा मेळावा हा पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.