मुंबई : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या चतुर्थ श्रेणीतील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यानुसार जिल्हा बँकेतील शिपाईपदाच्या भरतीला आता ऑनलाइन पद्धतीतून वगळण्यात आले आहे. १०० टक्के स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या भरती प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार झाल्यास संचालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शासनाच्या सहकार विभागाकडून देण्यात आला आहे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून भरती प्रक्रियेविषयीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने, त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने भरती नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

या नव्या निर्णयानुसार शिपाई पदाची भरती संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ऑफलाइन पद्धतीनेच केली जाणार आहे. लेखी परीक्षा अनुभवी आणि तज्ज्ञ संस्थेमार्फत घेणे बंधनकारक राहील. कोणताही गैरप्रकार झाल्यास संबंधित बँकेच्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

१२वी उत्तीर्ण असणे आवश्यक

या पदासाठी आता लेखी परीक्षेला ७० गुण आणि मुलाखतीला ३० गुण अशी गुणरचना निश्चित करण्यात आली असून, किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण अशी ठेवण्यात आली आहे. तसेच संबंधित जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना १०० टक्के प्राधान्य देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयीची गुणवत्ता यादी जाही करण्यात आली असून भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रता, लेखी कामगिरी आणि मुलाखतीतील सादरीकरण या तिन्ही बाबींना महत्त्व राहणार आहे.

….तर जिल्ह्याबाहेरील उमेदवार

स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि जिल्ह्याबाहेरील उमेदवारांवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी चतुर्थ श्रेणीतील पदभरतीमध्ये संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांना १०० टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, आवश्यक संख्येने पात्र स्थानिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास उर्वरित पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांमधून भरण्याची मुभा देण्याचा सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात २२ जून २०२६ रोजी काढण्यात आलेले यासंदर्भातील परिपत्रक रद्द करून नव्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील शिपाई भरती आता सुधारित नियमांनुसारच होणार आहे.