मुंबई : मध्य रेल्वेवरील दिवा रेल्वे स्थानकात कल्याणच्या दिशेकडील पादचारी पुलाच्या तुळया बसवण्यासाठी शनिवारच्या मध्यरात्री विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री १.१० ते ४.२५ या वेळेत मुंब्रा ते दातिवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर हा ब्लॉक असेल. या कामामुळे दोन लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
रोड क्रेनच्या साहाय्याने तुळया बसवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे शनिवारी मध्यरात्री सुटणारी गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस मध्यरात्री १२.४५ ऐवजी पहाटे ४ वाजता सुटेल. त्यामुळे ही गाडी नियोजित वेळेपेक्षा तीन तास १५ मिनिटे उशिराने रवाना होईल. दरम्यान, गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस निळजे स्थानकात रात्री ३.३४ ते ४.२५ या वेळेत थांबवून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
