मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दिवा स्थानकाजवळ नव्या पादचारी पुलासाठी तुळया उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मंगळवारी मध्यरात्री दिवा स्थानक परिसरात विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यामुळे काही लोकल; तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक मंगळवारी मध्यरात्री १२.१० ते पहाटे ४.१० वाजेपर्यंत घेण्यात येईल. या ब्लाॅक कालावधीत नवीन पादचारी पुलाच्या तुळयांची उभारणी ३०० मेट्रिक टन क्षमतेच्या रोड क्रेनच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. ब्लाॅकदरम्यान ठाणे – डोंबिवली अप आणि डाऊन जलद मार्गिका, पाचवी व सहावी मार्गिका, तसेच दिवा – निळजे दरम्यानची दिवा – पनवेल – रोहा मार्गिका प्रभावित होईल. मंगळवारी रात्री ३.४३ वाजता अंबरनाथहून सुटणारी अंबरनाथ-सीएसएमटी लोकल, पहाटे ५.१६ वाजता सीएसएमटीहून सुटणारी सीएसएमटी-अंबरनाथ लोकल रद्द करण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत कल्याण-ठाणे विभागातील अप जलद मार्गिका आणि सहाव्या मार्गिकेवरील मेल व एक्स्प्रेस गाड्या अप धीम्या मार्गिकेवर वळविण्यात येतील.

गाडी क्रमांक ११००३ दादर – सावंतवाडी रोड रेल्वेगाडी मंगळवारी मध्यरात्री १२.०५ वाजता सुटण्याऐवजी पहाटे ४ वाजता सुटेल. गाडी क्रमांक १२१४१ एलटीटी – पाटलीपुत्र अतिजलद एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२८४८ एलटीटी – विशाखापट्टणम एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक २२५३८ एलटीटी – गोरखपूर कुशीनगर अतिजलद एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या ठाणे ते कल्याणदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटलीपुत्र सुपरफास्ट एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांचे मार्ग मुलुंड-कल्याण दरम्यान बदलण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१०२६ बलिया-दादर विशेष, गाडी क्रमांक १२१०२ ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०२० कोणार्क एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १८०३० शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२८१० हावडा-सीएसएमटी मेल, गाडी क्रमांक १८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २०१०४ गोरखपूर-एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२७०२ हुसैन सागर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १११४० होस्पेट-सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. उशिराने धावणाऱ्या मेल-एक्सप्रेस आणि विशेष गाड्यांचे मार्गही गरजेनुसार बदलले जातील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.