अग्निशमन दलाचे विभाजन करा!

मुंबईमधील बहुमजली इमारतींना आग लागण्याच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ आणि अन्य कामांमुळे अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येऊ लागला आहे.

‘वन अविघ्न पार्क’ आग दुर्घटनेच्या अहवालातील सूचना

मुंबई : मुंबईमधील बहुमजली इमारतींना आग लागण्याच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ आणि अन्य कामांमुळे अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येऊ लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे विभाजन करण्याची गरज पुन्हा व्यक्त होत आहे. ‘वन अविघ्न पार्क’ इमारत आग दुर्घटनेप्रकरणी सादर करण्यात आलेल्या अहवालात अग्निशमन व प्रतिबंधासाठी एक आणि विविध तपासणी, परवानगी कामांसाठी दुसरा असे दोन विभाग करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

करीरोड येथील ‘वन अविघ्न पार्क’ इमारतीत २२ ऑक्टोबर रोजी लागलेल्या आगीबाबतचा चौकशी अहवाल समितीने नुकताच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सादर केला. त्यात दुर्घटनेशी संबंधित कारणे आणि उपाययोजना सुचवतानाच समितीने अग्निशमन दलाच्या विभाजनाची गरजही व्यक्त केली आहे.

उत्तुंग इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेची नियमित तपासणी करणे, पुढील कारवाई करणे अग्निशमन दलासाठी जिकरीचे होत असल्यामुळे आग्निशमन आणि अग्निप्रतिबंध, तपासणी, परवानग्या याकरीता दोन स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचे सूतोवाच चौकशी समितीने केले आहे.

आग लागणे, इमारत कोसळणे, झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या पक्ष्याची सुटका करणे, रस्त्यावर वाहनातून सांडलेल्या डिझेलमुळे वाहनांचा अपघात टाळण्यासाठी बंदोबस्त करणे आदी विविध प्रकारची कामे अग्निशमन दलातील अधिकारी, जवानांना करावी लागतात. त्यातच मोठी दुर्घटना घटल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना संकटमोचक बनून घटनास्थळी धाव घ्यावी लागते. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत बहुमजली इमारतींची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. या इमारतींमध्ये आग लागण्याच्या घटनाही वाढत आहेत. बहुमजली इमारतींमधील अग्निप्रतंबंध यंत्रणेची तपासणी करण्याचे कामही मध्यंतरी अग्निशमन दलावर सोपविण्यात आले होते. मात्र अग्निशमन दलातील उपलब्ध मनुष्यबळ लक्षात घेता अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येऊ लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन अग्निप्रतिबंध

यंत्रणा तपासणीसाठी अग्निशमन दलामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय पालिका  प्रशासनाने काही वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, त्यावर पुढे काही कार्यवाही झाली नव्हती. आता तोच मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अहवालातील अन्य शिफारशी

  • ७० मीटरपेक्षा उंच इमारतींत सक्षम अग्निशमन यंत्रणा नियमित कार्यान्वित करणे आवश्यक.
  • उत्तुंग इमारतींध्ये परवानाधारक संस्थेद्वारे अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर अशा ठिकाणी नियमित तपासण्या कराव्यात.
  • महाराष्ट्र आग प्रतिबंध व जीव संरक्षक अधिनियम २००६ कायद्यामध्ये विद्युत परीक्षणाबाबत योग्य ती तरतूद करण्याकरीता प्रयत्न करावेत.
  • इमारतींच्या सदनिकांमध्ये अंतर्गत सजावटीसाठी करण्यात येणाऱ्या

बदलांवर पालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. या बदलांबाबत तक्रारी आल्यानंतरच पालिकेला त्याबाबत माहिती होते. त्यामुळे अंतर्गत सजावटकार हे वास्तुविशारदांप्रमाणे परवानाधारक, व नोंदणीकृत असावेत.

सदोष विद्युत यंत्रणा, अंतर्गत बदलांवर ठपका

ही आग सदोष विद्युत यंत्रणेमुळे लागली असून सदनिकेत अनधिकृतपणे केलेल्या अंतर्गत बदलांमुळे आग भडकल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच सदनिकेतील अग्निरोधक यंत्रणा काम करीत नसल्याचेही यात म्हटले आहे. त्याचबरोबर भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून ७० मीटरपेक्षा उंच इमारतींमध्ये सक्षम अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी समिती स्थापन करावी, अशी शिफारसही करण्यात आली आहे. तसेच इमारतीतील अग्निप्रतिबंधक यंत्रणा सदोष असल्याचे सांगतानाच ७० मीटरपेक्षा उंच इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा सक्षम करण्यासाठी समिती नेमण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Divide fire brigade ysh

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या