मुंबई : मोबाइलच्या विश्वात हरवत चाललेल्या पिढीला वाचनाची गोडी लागावी म्हणून पालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईतील २४ विभागांतील २४ उद्यानांत मोफत वाचनालये सुरू करण्याचे ठरवले असून कुलाबा येथील कूपरेज बॅण्ड स्टॅण्ड उद्यानापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अतिरिक्त पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पालिकेच्या उद्यान विभागामार्फत सामाजिक दायित्व (सीएसआर)च्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक प्रशासकीय विभागात एक याप्रमाणे २४ विभागांतील २४ उद्यानांमध्ये मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे.
या वाचनालयांमध्ये निसर्ग, विविध महापुरुषांची चरित्रे, इतिहास, वृक्ष-फुले-फळे, आरोग्य, चांगल्या जीवन शैलीविषयक तसेच लहानग्यांचा विकास व्हावा, या हेतूने विविध बोधपर गोष्टी तसेच खेळ आणि व्यायामाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून त्या संदर्भातील पुस्तकेही या वाचनालयांमध्ये वाचनास उपलब्ध करण्यात आली आहेत. संस्थांना किंवा वाचनप्रेमींना या उपक्रमासाठी पुस्तके दान करायची असल्यास त्यांनी विभाग कार्यालयातील उद्यान विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र पदरेशी यांनी केले.
असा उपक्रम
ज्या उद्यानांमध्ये बसण्याची व्यवस्था, पावसापासून संरक्षण देणारी खोली असलेल्या उद्यानांची या उपक्रमासाठी निवड केली जाणार आहे. उद्यानात येणाऱ्यांना नोंदवहीत नोंद करून आपल्याला हवे ते पुस्तक तिथेच बसून वाचता येणार आहे. जाताना पुस्तक परत करावे लागणार आहे.