समुपदेशकाच्या सल्ल्याने २०० संसार मोडण्यापासून वाचले
तिशीत असलेल्या नरेश शर्मा (नाव बदलले आहे) यांच्या ‘पदरी’ तीन मुले. पदरी म्हणायचे कारण की, पत्नी वडिलांच्या धाकात असल्याने तिचे पतीशी कधीच पटले नाही. भांडणे टोकाला गेल्यानंतर ती घर सोडून माहेरी निघून गेली. तेव्हापासून नोकरीसोबत आपल्या तीन मुलांचा सांभाळ नरेशजी करत होते. त्यांनी पत्नीची खूप समजूत काढली. पण, मुलीला घटस्फोट द्या, अमुक इतकी पोटगी द्या, हा वडिलांचा धोशा कायम होता. कंटाळून त्यांनी नाद सोडला. पण, मुलांसाठी तरी तिने घरी यावं, असं त्यांना वारंवार वाटत होतं. शेवटी त्यांनी तिला गाठून वडिलांच्या हेकेखोरपणामुळे आपल्या दोघांबरोबरच मुलांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते आहे हे पटवून दिले. आपल्या सहजीवनातून उभयतांबरोबरच मुलांचेही आयुष्य फुलवू.. यातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा माझ्या पगारातून तीन-चार हजार रुपयांची पोटगी मिळवून तू सुखी होणार आहेस का, हा नरेशजींचा कळीचा सवाल ऐकणाऱ्यालाही हेलावून टाकत होता तर तो त्यांच्या पत्नीच्या काळजाला न भिडेल तरच नवल! पतीच्या या आर्जवाला मान देत तीही घरी परतली. आज या पाच जणांचे कुटुंब पुन्हा एकदा बहरले आहे. मोडून पडलेल्या पण ‘तिसऱ्या’च्या विवेकी व सयंत मध्यस्थीमुळे पुन्हा एकदा सावरलेल्या अशा संसाराच्या अनेक गोष्टी गुरुवारी कुटुंब न्यायालयाच्या आवारात ऐकायला मिळाल्या. अशी एक-दोन नव्हे, तर तब्बल २०० जोडपी गेल्या वर्षभरात ‘दोघातील तिसऱ्या’ म्हणजे समुपदेशकांच्या समजुतीमुळे पुन्हा सुखाने नांदू लागली आहेत.
गेली दोन वर्षे ‘जागतिक प्रेम दिना’चे औचित्य साधून विभक्ततेच्या उंबऱ्यावरून मागे फिरलेल्या जोडप्यांचा सत्कार कुटुंब न्यायालयातर्फे केला जातो. यंदाही अशा २० जोडप्यांना रोपटे देऊन गौरविण्यात आले. या जोडप्यांकडून प्रेरणा घेऊन घटस्फोटाचा विचार करणाऱ्या जोडप्यांनी विवाह बंधनाला अबाधित ठेवण्यासाठी आणि समाजाला सशक्त करणाऱ्या कुटुंब व्यवस्थेला हातभार लावावा असे आवाहन न्या.एस.ए मोरे यांनी यावेळी केले. प्रत्येकाने विवाहाच्या नात्यामध्ये आपला अहं बाजूला ठेवून सामंजस्याने संसार केला तर नात्यांमध्ये होणारे वाद टाळले जाऊ शकतात हा समुपदेशक व न्यायाधीशांच्या भाषणाचा सूर होता.
विवाहाच्या नात्यात पती-पत्नीमध्ये मैत्रीचे संबंध असणे ही यशस्वी विवाहाची गुरुकिल्ली आहे. आपला अहंभाव बाजूला सारून एकमेकांना समजून वागलात तर विभक्त होण्याची गरज भासणार नाही असे या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून पत्नी सरिता हिच्यासह उपस्थित असलेले भरत जाधव यांनी सांगितले. तर विवाहाच्या वेळी ज्याप्रमाणे शालू व शेल्याची गाठ अलगदपणे बांधली जाते त्याचप्रमाणे आपली नातीदेखील हळुवारपणे आणि प्रेमाने हाताळावी. पती-पत्नी नात्यामधील प्रेमाचे रूपांतर हे सन्मानात होणे गरजेचे आहे, असे अभिनेता अविनाश नारकर यांनी सांगितले. त्यांची पत्नी ऐश्वर्या नारकर देखील यावेळी उपस्थित होत्या. अनेक जोडप्यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. समुपदेशनामुळे नात्यातील गुंता सुटल्याचे अनेकांनी आवर्जून नमूद केले.